कोकण टॅलेंट फोरमच्या शैक्षणिक विभाग व आयडियल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शैक्षणिक स्पर्धांमध्ये कडवई येथील द एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथील विद्यार्थिनी कुमारी शर्लीज शाहिद अहमद तुळवे हिने उल्लेखनीय कामगिरी करत शब्दरचना (Word Formation) या जिल्हास्तरीय आंतरशालेय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
ही स्पर्धा चिपळूण येथील मुरादपूर परिसरातील महाराष्ट्र हायस्कूल अँड ए. इ. कालसेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी पार पडली. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध नामांकित शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत कुमारी शर्लीज तुळवे हिने आपल्या उत्कृष्ट भाषिक कौशल्य, समृद्ध शब्दसंपदा व सृजनशीलतेच्या जोरावर परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत हे यश संपादन केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल तिला कोकण टॅलेंट फोरम व आयडियल फाउंडेशन यांच्यावतीने सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम प्रदान करून गौरविण्यात आले. कुमारी शर्लीज तुळवेच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक कारीगर रिजवान , शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच शुभचिंतकांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
