रत्नागिरीरत्नागिरीत २ ते ४ जानेवारी रोजी 'संगीत नाट्य महोत्सव'; एन.सी.पी.ए. आणि 'खल्वायन'चा...

रत्नागिरीत २ ते ४ जानेवारी रोजी ‘संगीत नाट्य महोत्सव’; एन.सी.पी.ए. आणि ‘खल्वायन’चा स्तुत्य उपक्रम

रत्नागिरी : महाराष्ट्राची वैभवशाली संगीत नाटक परंपरा जोपासण्यासाठी कटिबद्ध असलेल्या ‘खल्वायन’ रत्नागिरी, एन.सी.पी.ए. (NCPA) मुंबई आणि सीएसआर पार्टनर सिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने रत्नागिरीत ‘संगीत नाट्य महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाचे हे दुसरे पर्व असून, २ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे हे प्रयोग सादर होणार आहेत. शुक्रवार, २ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते या महोत्सवाचे शानदार उद्घाटन होईल.

गेल्या २८ वर्षांपासून रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रात ‘खल्वायन’ ही संस्था अविरत कार्यरत आहे. आजवर ३२० मासिक संगीत सभा, ५४ विशेष संगीत सभा आणि १७ नव्या-जुन्या संगीत नाटकांची यशस्वी निर्मिती करून संस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या कार्याची दखल घेत एन.सी.पी.ए. मुंबईने खल्वायनच्या सहकार्याने या महोत्सवाचे पाऊल उचलले आहे. या तीन दिवसीय महोत्सवात २ जानेवारी रोजी ५३ व्या राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त ‘संगीत संशयकल्लोळ’ हे नाटक सादर होईल. त्यानंतर ३ जानेवारी रोजी डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित ‘संगीत शांतिब्रह्म’ आणि ४ जानेवारी रोजी प्रल्हाद केशव अत्रे लिखित सुप्रसिद्ध ‘संगीत प्रीतीसंगम’ ही नाटके सादर केली जातील.

नाट्यरसिकांसाठी सवलतीच्या दरात सीझन तिकीट आणि दैनिक तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सीझन तिकिटांचे दर ५००, ४०० आणि ३०० रुपये असून, याची विक्री २८ डिसेंबर २०२५ पासून सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत सुरू होईल. तसेच दैनिक तिकीट ३००, २५० आणि २०० रुपयांना प्रयोगाच्या दिवशी सकाळी ९ वाजल्यापासून उपलब्ध असेल. रत्नागिरी आणि परिसरातील संगीत नाट्य प्रेमींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एन.सी.पी.ए. मुंबई, खल्वायन रत्नागिरी आणि सीएसआर पार्टनर सिटी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Breaking News