रत्नागिरीआगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यातील कडवई गटाची...

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यातील कडवई गटाची महत्त्वपूर्ण बैठक

आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा एकमुखी विश्वास

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यातील कडवई जिल्हा परिषद गटाची एक महत्त्वपूर्ण व निर्णायक बैठक आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत पार पडली. बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक मजबुती, निवडणुकीची तयारी आणि कार्यकर्त्यांची भूमिका यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक पातळीवरील राजकीय हालचाली, संभाव्य आव्हाने आणि आगामी निवडणुकांतील रणनीती यांचा सखोल आढावा घेत ही बैठक मार्गदर्शक ठरली.
बैठकीत आमदार शेखर निकम यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दांत मार्गदर्शन करत सांगितले की, राजकारणातील समीकरणे सतत बदलत असतात, मात्र अशा काळात पक्ष संघटना अधिक भक्कम, शिस्तबद्ध आणि सक्रिय असणे अत्यंत आवश्यक आहे. युती झाली तर ती स्वागतार्ह असेल, परंतु युती न झाल्यास स्वबळावर सक्षमपणे निवडणूक कशी लढायची, यासाठी आतापासूनच तयारीला लागण्याचे त्यांनी आवाहन केले. प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी ओळखून, तळागाळात काम केल्यास यश निश्चित मिळते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांकडून आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वावर एकमुखी विश्वास व्यक्त करण्यात आला. “आपण सांगाल ते धोरण आणि तुम्ही बांधाल ते तोरण” अशा भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांनी नेतृत्वावर पूर्ण निष्ठा असल्याचे दाखवून दिले. या घोषणेमुळे कडवई गटातील संघटनात्मक एकजूट आणि आमदारांच्या नेतृत्वावर असलेला दृढ विश्वास अधोरेखित झाला.
यावेळी आमदार शेखर निकम यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त करत सांगितले की, गावविकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. विकासकामे करताना पक्षभेद न ठेवता सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल. मात्र कार्यकर्त्यांनी आपले काम प्रामाणिकपणे, चोखपणे करावे, संघटना अधिक मजबूत करावी आणि पक्षाने दिलेला उमेदवार कोणताही असो, वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून त्याला बहुमताने निवडून आणावे, असे स्पष्ट आवाहन त्यांनी केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीस राजेंद्र सुर्वे, राजेंद्र पोमेडकर, तुकाराम येडगे, संतोष जाधव, सहदेव सुवरे, पप्पू ब्रीद, संतोष भडवळकर, राजेश मोहिते, उदय मोहिते, बाबुराव मोहिते, संतोष चरकरी, अशोक चव्हाण, भाई गुरव, संतोष अलीम, मनोहर खासासे, डिके गावकर, पांडुरंग डिके, सीताराम चिले, बाईत गावकर, कृष्णा ओकते, बाळकृष्ण डिके, राहील कडवईकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमुळे कडवई गटात आगामी निवडणुकांसाठी नव्या जोमाने तयारी सुरू झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.

Breaking News