रत्नागिरीसावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था यांच्या वतीने सावर्डे येथील सह्याद्री क्रीडा संकुलावर...

सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था यांच्या वतीने सावर्डे येथील सह्याद्री क्रीडा संकुलावर देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था यांच्या वतीने सावर्डे येथील सह्याद्री क्रीडा संकुलावर देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त मारुतीराव घाग यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी ध्वजगीत, ध्वज प्रतिज्ञा व संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी जोशात राष्ट्रनारे दिले.
सावर्डे विद्यालयातील महाराष्ट्र छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करत ध्वजाला सलामी दिली. विद्यालयाच्या वाद्यवृंद विभागाने देशभक्तीपर गीतांचे सुमधुर गायन सादर केले. सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी लेझीम व झांज नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विशेष आकर्षण ठरलेली साडी ड्रिल (साडी नृत्य) अतिशय शिस्तबद्ध व प्रभावी पद्धतीने सादर करण्यात आली. यांना अमित साळवी, सिद्धी सावंत व योगेश नाचणकर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त शांताराम खानविलकर, मारुतीराव घाग, सचिव महेश महाडिक, उद्योजक प्रशांत निकम, माजी पंचायत समिती सभापती सौ. पूजाताई निकम, सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम, प्रतिष्ठित ग्रामस्थ, पालक, विविध शाखांतील प्राचार्य, शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक दादासाहेब पांढरे, प्रशांत सकपाळ, अमृत कडगावे व रोहित गमरे यांनी केले.
याच अनुषंगाने विद्यालय परिसरात सकाळी ७.४५ वाजता शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्यगीत गायन झाले. यावेळी असाक्षर मुक्त गाव, कुष्ठरोग निर्मूलन तसेच दहावी व बारावी कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षा शपथ घेण्यात आली.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आदर्श विद्यार्थी मंगेश भुवड, आदर्श विद्यार्थिनी सपना ठाकूर तसेच राज्यस्तरीय खेळाडूंमध्ये रायफल शूटिंग – यश सावंत, कबड्डी – समर्थ घाणेकर, जलतरण – आरोही पालखडे, डॉजबॉल – प्राची जाधव व सानवी शिर्के यांचा सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी सामुदायिक कवायतींचे आयोजन करण्यात आले. यात रिंग कवायत, ध्वज कवायत, करेला कवायत, डंबेल्स कवायत, घुंगुर काठी व पारिजातक फुलांची कवायत तसेच विविधतेत एकता दर्शवणारी साडी ड्रिल सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज कुलकर्णी यांनी केले.
एकूणच सह्याद्री शिक्षण संस्थेत प्रजासत्ताक दिनाचा उत्सव शिस्त, राष्ट्रप्रेम व सांस्कृतिक वैभव यांचा सुरेख संगम ठरला.

Breaking News