रत्नागिरी – भारतीय तटरक्षक दलाच्या सुवर्ण महोत्सवी (५० व्या) वर्धापन दिनानिमित्त, आयसीजीएस रत्नागिरीतर्फे आज एका विशेष स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सागरी सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी दलाने दिलेल्या पाच दशकांच्या समर्पित सेवेचे प्रतीक म्हणून हा सोहळा साजरा करण्यात आला.
रत्नागिरीतील विविध तटरक्षक दलाच्या कार्यालयांतील अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, या कार्यक्रमाला रत्नागिरीचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. व्ही. वाय. जाधव, तटरक्षक वायू अवस्थानचे कमांडिंग ऑफिसर डीआयजी टी. एन. उपाध्याय, जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल, भा प्र से, पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे, भा पो से यांच्यासह अनेक वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते. १९७७ मधील स्थापनेपासून तटरक्षक दलाचा देदिप्यमान वारसा साजरा करणे आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सुरक्षा यंत्रणेतील विविध यंत्रणांमधील समन्वय अधिक दृढ करणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. जिल्ह्यातील नागरी प्रशासन आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे ‘सागराचे रक्षक’ आणि स्थानिक जनता यांच्यातील अतूट नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
यावेळी बीजभाषण करताना भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे स्टेशन कमांडर कमांडंट शैलेश गुप्ता यांनी, तटरक्षक दलाचे एका जागतिक दर्जाच्या सागरी दलात झालेल्या रूपांतराचा आढावा घेतला आणि सागरी सुरक्षा, विशेषतः किनारी सुरक्षिततेबद्दलच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, “आज येथे उपस्थित असलेले जिल्हा प्रशासन आणि स्थानिक मान्यवर आमची सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सामूहिक समन्वयाचे प्रतीक आहेत.” यावेळी त्यांनी प्रतिपादन केले कि भारतीय तटरक्षक दलाची आजमितीस देशभरात ४२ अवस्थाने,१६ जिल्हा मुख्यालये, १३ वायू एनक्लेव आणि ०२ वायू अवस्थान असून १५५ जहाजे, ८० हवाई साधने आणि १४ होवरक्राफ्ट असून ती प्रामुख्याने शासनाच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेतून साकार झालेली आहेत. स्थापनेपासून आजपर्यंत तटरक्षक दलाने ११८२१ प्राण वाचविले आहेत, रुपये ५४४३७.९६ किमतीचे प्रतिबंधित अमली पदार्थ जप्त केले आहेत त्याशिवाय अनेक सागरी प्रदूषण प्रतिबंधात्मक व विलुप्तप्राय सागरी जीवांच्या तस्करीच्या विरोधी अनेक कार्यावाह्या केल्या आहेत. त्याशिवाय नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये देखील तटरक्षक दलाने महत्वाची भूमिका बजाविली आहे.
हे स्नेहसंमेलन म्हणजे महिनाभर भारतीय तटरक्षक रत्नागिरीतर्फे राबवण्यात आलेल्या विविध जनजागृती उपक्रमांचा समारोप होता. यामध्ये सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी स्थानिक मच्छिमार समुदायाशी संवाद साधणारा ‘कम्युनिटी इंटरअॅक्शन प्रोग्राम’, ५० रायडर्सचा समावेश असलेली गुहागरपर्यंतची दुचाकी रॅली, शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्याख्याने आणि तरुण पिढीला सागरी क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी आयोजित केलेली चित्रकला स्पर्धा अशा विविध उपक्रमांचा समावेश होता.
गेल्या पन्नास वर्षांपासून भारताच्या सागरी सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या अधिकारी आणि जवानांना मानवंदना देऊन आणि “सदैव सतर्क” राहण्याचा संकल्प करून या सोहळ्याची सांगता झाली.
