रत्नागिरी“रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर महायुतीचा झेंडा फडकवावा .. उपमुख्यमंत्री एकनाथ...

“रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर महायुतीचा झेंडा फडकवावा .. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आवाहन

लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नसल्याचे ही दिले जाहीर आश्वासन-

रत्नागिरी येथे आयोजित विराट जाहीर प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी केली जोरदार बॅटिंग..

कोकण आता थांबणार नाही! महामार्ग, ग्रोथ सेंटर्स आणि उद्योगात कोकणही राहणार अग्रेसर–

“मुंबई–पुण्याच्या रांगेत कोकण! विरोधकांना विकासाच्या रणांगणात थेट आव्हान”

रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र*
रत्नागिरी, कोकण आता मागे राहणार नाही. मुंबई, पुणे, नागपूरच्या पंक्तीत उभं राहणार! वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या कोकणासाठी ‘गेम चेंजर’ ठरणाऱ्या महामार्ग, ग्रोथ सेंटर्स, पर्यटन हब आणि उद्योग प्रकल्पांची घोषणा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट विरोधकांना आव्हान दिलं. “हे केवळ रस्ते नाहीत, हा कोकणाच्या भविष्याचा मार्ग आहे. जो रोजगार, उद्योग आणि समृद्धी थेट गावागावात घेऊन येणार आहे!” अशा शब्दांत त्यांनी कोकणाच्या विकासाची रणभेरी फुंकली.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथील साळवी स्टॉप परिसरात झालेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणासाठी ‘गेम चेंजर’ ठरणाऱ्या प्रकल्पांची आक्रमक भूमिका मांडत विकासाचा थेट अजेंडा समोर ठेवला.

सागरी मार्ग आणि कोस्टल रोडच्या कडेला उभारण्यात येणारी ११ ग्रोथ सेंटर्स ही कोकणाच्या अर्थव्यवस्थेची नवी इंजिनं ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या केंद्रांमुळे हजारो नव्हे तर लाखो लोकांच्या हाताला रोजगार मिळणार असून, नोकरीसाठी गाव सोडण्याची वेळ येणार नाही. मत्स्य उद्योग, काजू, नारळ, आंबा प्रक्रिया उद्योगांना विशेष पॅकेज देऊन स्थानिक उत्पादकांना जागतिक बाजाराशी जोडण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलं असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
कोकणाच्या ७२० किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्याचा पर्यटनाच्या दृष्टीने पूर्ण वापर करून ‘ग्लोबल व्हिलेज’ संकल्पना राबवली जाणार असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं. बीच कनेक्टिव्हिटी, पर्यटन हब, रिसॉर्ट्स, वॉटर स्पोर्ट्स आणि स्थानिक हस्तकलेला प्रोत्साहन देऊन कोकणाला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.
दाभोळ खाडीवरील पूल, पानंद रस्ते, ग्रामसडक योजना, पाणीपुरवठा योजना आणि ग्रामीण भागासाठी पायाभूत सुविधांचं मजबूत जाळं उभं केलं जात असल्याचाही त्यांनी आढावा घेतला. एमएसआरडीसीमार्फत रस्ते, सागरी मार्ग आणि कोस्टल कनेक्टिव्हिटीला गती देण्यात येत असून, त्यामुळे उद्योग आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

“आमचा अजेंडा खुर्चीचा नाही, तर कोकणाच्या भविष्याचा आहे. आम्ही घोषणा करून थांबत नाही, प्रकल्प जमिनीवर उतरवतो,” असं ठामपणे सांगत शिंदे यांनी महायुती सरकारचा विकासाभिमुख दृष्टिकोन अधोरेखित केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत महायुतीची सत्ता आल्याशिवाय हे ‘गेम चेंजर’ प्रकल्प पूर्ण ताकदीने राबवता येणार नाहीत, असं सांगत त्यांनी मतदारांना थेट आवाहन केलं.
शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्याचं कौतुक करत म्हटलं,
“हा जिल्हा केवळ रत्नांची खाण नाही, तर देशाला भारतरत्न देणारी भूमी आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा कोकण कष्टकरी, बुद्धिमान आणि लढवय्या माणसांचा प्रदेश आहे.” रत्नागिरीकर फसवणूक सहन करत नाहीत, योग्यवेळी योग्य ठिकाणी उत्तर देतात, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत ३२ पैकी २९ जागा महायुतीने जिंकल्या, याचा उल्लेख करत नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्षांचं अभिनंदन करण्यात आलं.
काही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने विजयाची नांदी सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं.

शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात ३० लाख कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आली आहे. यातील अनेक उद्योग कोकणात येणार असून, त्यामुळे स्थानिक तरुणांना आपल्या गावातच रोजगार मिळेल. “कोकणातील तरुणाला कामासाठी गाव सोडावं लागणार नाही, हेच आमचं ध्येय आहे.”
मुख्यमंत्री असताना राबवलेल्या योजनांचा आढावा घेताना त्यांनी सांगितलं लाडकी बहिण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटीमध्ये ५०% सवलत, शेतकरी सन्मान योजना, पिक विमा योजना
शेतकऱ्यांसाठी वार्षिक १२,००० रुपयांची मदत दिली असल्याचे सांगितले.
“शेतकरी हा अन्नदाता आहे. संकटात सरकार त्याच्या पाठीशी उभं राहतं,” असं त्यांनी स्पष्ट केलं. सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी भरपाईचे निर्णय घेतल्याचाही उल्लेख केला.

लाडकी बहिण योजनेवर बोलताना शिंदे आक्रमक झाले. “ही योजना कधीच बंद होणार नाही. निवडणुकीपुरती नाही, दर महिन्याला थेट खात्यात पैसे जमा होणार. वर्षाला ४५ हजार कोटींचा खर्च असला तरी तो गोरगरीब, महिलांसाठीच आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी बचत गट, छोटे उद्योग, क्रेडिट सोसायट्या यांना चालना देण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
महिलांसाठी मॅमोग्राफी आणि कॅन्सर डिटेक्शन मोबाईल व्हॅन्स, ३ कोटी महिलांची तपासणी मोहीम, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा १.५ लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढ, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ७,००० बालहृदय शस्त्रक्रिया या सर्व योजनांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

सभेच्या शेवटी, “धनुष्यबाण आणि कमळाला मत म्हणजे विकासाला मत. आपल्या गावाचा, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी योग्य बटण दाबा आणि रत्नागिरी जिल्ह्यावर पुन्हा एकदा महायुतीचा भगवा झेंडा डौलाने फडकवा,” असं म्हणत त्यांनी उपस्थितांना जोशात मतदान करण्याची साद घातली.

यावेळी उद्योग तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेचे सर्व उमेदवार, नगरपालिका निवडणुकीत विजयी ठरलेले उमेदवार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News