निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, आरोग्य शिबीर, स्वच्छता मोहीम, प्रभात फेरी राबवून प्रचार प्रसिध्दी करा
– अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे
रत्नागिरी, (जिमाका) : नवी मुंबई येथील खारघर येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी ‘हिंद की चादर गुरु तेग बहादूर साहिबीजी यांचा 350 व्या शहिदी समागम कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाची विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रचार प्रसिध्दी करावी, अशी सूचना अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी केली.
नवी मुंबई येथील खारघर येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी ‘हिंद की चादर गुरु तेग बहादूर साहिबीजी यांचा 350 व्या शहिदी समागम कार्यक्रम होत आहे. याबाबत आज बैठक घेण्यात आली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यंवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, नायब तहसिलदार दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी श्री. गलांडे म्हणाले, जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घ्याव्यात. ग्रामपंचायत तसेच नगरपालिका विभागांनी स्वच्छता मोहीम राबवावी. ग्रामपंचायतींमध्ये लाऊड स्पीकरवरुन गीत वाजवावे. प्रभात फेरीच्या माध्यमातून प्रचार प्रसिध्दी करावी. आरोग्य विभागाने शाळांमध्ये आरोग्य तपासणी शिबीर राबवावेत. चित्रपटगृहांमधून देखील गीत दाखविण्यात यावे.
‘हिंद की चादर गुरु तेग बहादूर साहिबीजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिध्दीबाबत सर्व विभागांनी नियोजन करुन, त्याची सुरुवात करावी. त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असेही ते म्हणाले.
