सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी, चिंचघरी सती, ता. चिपळूण जि. रत्नागिरी ही गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारी एक अग्रगण्य उपक्रमशील शाळा आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचेकडून घेण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) बाह्य मूल्यांकनात महाराष्ट्र राज्यात एकूण 429 शाळा ए प्लस दर्जाच्या ठरल्या आहेत.
यामध्ये सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी (सती) ता.चिपळूण या विद्यालयाचा अ+ विद्यालय म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. शासनाकडून नुकतेच पत्र काढून ए प्लस अशा गुणवत्तापूर्ण शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सदर मूल्यांकन हे शाळेसाठी एक गौरवास्पद व अभिमानास्पद बाब आहे. सदर मूल्यांकन 128 मुद्द्यांचे असते, यामध्ये शाळेची गुणवत्ता, भौतिक सुविधा परिपूर्णपणे तपासल्या जातात. या सर्वांमध्ये ही शाळा अव्वल ठरली आहे. शाळेने मिळवलेल्या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष विद्यमान लोकप्रिय आमदार माननीय श्री. शेखरजी निकम साहेब यांनी विशेष पत्र देऊन शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे संस्थेचे सेक्रेटरी श्री. महेशजी महाडिक सर यांनी देखील शाळेचे भरभरून कौतुक केले आहे. विद्यालयाच्या या यशामध्ये विद्यालयाचे सर्व शिक्षक, संस्था पदाधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांचा विशेष वाटा आहे.
