पश्चिम आशियातील युद्धामुळे महाराष्ट्रातील कृषी निर्यातीला मोठा फटका; हजारो कोटींचे नुकसान होण्याची भीती
नाशिक :- इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे पश्चिम आशियात युद्धाची ठिणगी पडली आहे. या युद्धाचा थेट आणि भीषण परिणाम महाराष्ट्रातील शेती क्षेत्रावर जाणवू लागला असून आखाती देशांकडे जाणारी हवाई व जलवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. विशेषतः नाशिकची द्राक्षे आणि जळगावच्या केळीची निर्यात थांबल्याने निर्यातदार आणि शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
गेल्या नऊ महिन्यांत (एप्रिल ते नोव्हेंबर) जिल्ह्यातून संयुक्त अरब अमिरात, सौदी अरब, इराक, कतार आणि कुवेत यांसारख्या देशांना ३,१०३ कोटी रुपयांची विक्रमी निर्यात झाली आहे. यात एकट्या दुबईचा वाटा १,८२९ कोटी रुपये इतका आहे. मात्र, दोन दिवसांपासून युद्धामुळे ही वाहतूक थांबवण्यात आली आहे.केळीचे सुमारे १४०० कंटेनर सध्या मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) येथे अडकून पडले आहेत.नाशिक विमानतळावरून आखाती देशांत जाणारी २५ कार्गो विमाने तूर्त थांबवण्यात आली आहेत.
नाशिक आणि मुंबई विमानतळावर निर्यातीसाठी आलेली खोकी पडून आहेत.सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असल्याने आखाती देशांमध्ये भारतीय फळांना, विशेषतः केळी आणि द्राक्षांना मोठी मागणी असते. भारतातून आखाती देशांत होणारी केळीची दररोजची सुमारे २५ कोटी रुपयांची उलाढाल आता पूर्णपणे ठप्प झाली आहे. आखाती देश जीवनावश्यक वस्तूंसाठी भारतावर अवलंबून असल्याने तिथेही आता या वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे.
केळी, द्राक्षे, संत्री आणि आंबा ही सर्व उत्पादने नाशवंत आहेत. जर युद्धाचा तणाव लवकर कमी झाला नाही, तर हजारो कोटींचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.जळगाव जिल्ह्यातून निर्याती साठी जाणारे दररोजचे १० ते १५ कंटेनर सध्या थांबलेले आहेत.
सुदैवाने सध्या देशांतर्गत बाजारपेठेत रमजानमुळे केळीला चांगली मागणी आहे, त्यामुळे सध्यातरी दरांवर फारसा परिणाम झालेला नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील ही पोकळी दीर्घकाळ राहिल्यास भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
