रत्नागिरीकळंबस्ते येथे ‘देवराई – द बोटॅनिकल गार्डन’चे आज उद्घाटन

कळंबस्ते येथे ‘देवराई – द बोटॅनिकल गार्डन’चे आज उद्घाटन

कळंबस्ते येथे ‘देवराई – द बोटॅनिकल गार्डन’चे आज उद्घाटन

पालकमंत्री उदय सामंत व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते लोकार्पण; पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचा प्रकल्प

✒️ शाहिद अहमद तुळवे/कडवई

दि. १४ मार्च

चिपळूण तालुक्यात कळंबस्ते येथे उभारण्यात आलेल्या ‘देवराई – द बोटॅनिकल गार्डन’ या पर्यावरणपूरक प्रकल्पाचे उद्घाटन आज, दि. १४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. कोकणातील जैवविविधता जपण्याच्या उद्देशाने साकारलेला हा प्रकल्प पर्यावरण संवर्धन आणि निसर्ग पर्यटनासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या प्रकल्पाचे उद्घाटन उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच या कार्यक्रमाला परिसरातील लोकप्रतिनिधी व अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कळंबस्ते येथे साकारण्यात आलेला हा प्रकल्प रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड (आरजीपीपीएल) आणि कान्साई नेरोलॅक पेंट्स यांच्या संयुक्त कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीतून उभारण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी स्थानिक प्रशासन आणि विविध संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
या देवराई प्रकल्पामध्ये विविध प्रकारच्या स्थानिक आणि दुर्मिळ वनस्पतींची लागवड करण्यात आली असून सुमारे २५० पेक्षा अधिक प्रजातींची झाडे व वनस्पती येथे लावण्यात आल्या आहेत. हा परिसर विद्यार्थ्यांसाठी अभ्यास, संशोधन आणि पर्यावरण शिक्षणासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तसेच उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, सह्याद्री निसर्ग मित्रचे संचालक भाऊ काटदरे, उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे आणि तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
कळंबस्ते (रेल्वे फाटकाजवळ), ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे होणारा हा उद्घाटन सोहळा पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असून भविष्यात हा प्रकल्प कोकणातील निसर्ग पर्यटन आणि जैवविविधता अभ्यासाचे केंद्र म्हणून विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Breaking News