हेच काय ते अच्छे दिन– रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मध्ये व्यावसायिक गॅसचा तुटवडा .नामांकित हॉटेलमध्ये पेटली पारंपरिक चुल
खेड : सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटू लागल्याने व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. परिणामी अनेक ठिकाणी कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यवसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये तर गॅस सिलेंडर उपलब्ध न झाल्याने पारंपरिक चुल पेटवून स्वयंपाक करण्याची वेळ मालकावर आली.
सध्या व्यावसायिक वापरासाठी लागणारे गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेल चालकांची मोठी गैरसोय होत आहे. रोजच्या ग्राहकांसाठी नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था सुरळीत ठेवणे कठीण झाले आहे. गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे काही हॉटेल व्यवसायिक पर्यायी उपायांचा अवलंब करताना दिसत आहेत. शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरची कमतरता जाणवू लागल्याने मालकाने पारंपरिक पद्धतीचा आधार घेत चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या घटनेची शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. आधुनिक स्वयंपाकघरात पुन्हा एकदा पारंपरिक चुलीचा वापर होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले तरी नागरिक मोठ्या प्रमाणात गॅस एजन्सीवर गर्दी करताना दिसत आहेत. भविष्यात गॅसचा तुटवडा वाढण्याची भीती व्यक्त करत अनेक जण आगाऊ सिलेंडर घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या राज्यात लग्नसराईचा हंगामही सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्वयंपाकाची व्यवस्था केली जाते. मात्र गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत न झाल्यास लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांनाही याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिक आणि हॉटेल व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
हेच काय ते अच्छे दिन- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मध्ये व्यावसायिक गॅसचा तुटवडा ,नामांकित हॉटेलमध्ये पेटली पारंपरिक चुल
