रत्नागिरीराजापूर शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - आमदार किरण सामंत...

राजापूर शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – आमदार किरण सामंत यांची ग्वाही

राजापूर शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – आमदार किरण सामंत यांची ग्वाही-

👉राजापूर नगर परिषदेला आमदार किरण सामंत यांनी दिली सदिच्छा भेट

राजापूर शहरात विकास कामांसाठी आवश्यक निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही,शहर विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही देतानाच नगरपरिषदेला आपले नेहमीच सहकार्य राहील, असे आश्वासन आमदार किरण सामंत यांनी दिले.दोन दिवसांपूर्वी त्यांनी राजापूर नगर परिषदेला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

लोकनियुक्त नगराध्यक्ष ऍड हुस्‍नबानू खलिफे यांच्या विनंतीला मान देऊन राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किरण सामंत हे राजापूर नगरपरिषद येथे आले होते. त्यावेळी नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक तसेच प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी नगरपरिषदेचे बॅ.नाथ पै सभागृहात आमदार .किरण सामंत यांच्या उपस्थितीत विविध विषयावर चर्चा पार पडली. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा ऍड . हुस्‍नबानू खलिफे या देखील उपस्थित होत्या. राजापूर नगरपरिषद दि.१ एप्रिल २०२६ रोजी १५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने पुढील वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी नगराध्‍यक्षांकडून देण्यात आली. या सर्व उपक्रमांना आपले सहकार्य राहील, अशी ग्वाही आमदार किरण सामंत यांनी यावेळी दिली. तसेच राजापूर नगरपरिषदेची हद्दवाढ, अनधिकृत मालमत्ता, देवस्थान इनाम, गावठाण क्षेत्र या क्षेत्रातील नागरिकांना घर दुरुस्ती व नवीन बांधकाम याला होणाऱ्या अडचणींबाबत देखील चर्चा पार पडली.

राजापूर नगरपरिषदेची प्रशासकीय इमारत, कर्मचारी निवासस्थान, रेस्‍ट हाऊस प्रस्तावित असून याकरीताही आपण पाठपुरावा करणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले. तर शहरातील देवस्थान इनाम जागेतील घर दुरूस्तीकरीता परवानगी मिळताना देवस्थान इमान बाबत अडचणी येत असल्याचा मुद्दा देखील या बैठकीत उपस्थित करण्यात आला. यावेळी लवकरच देवस्थान इनाम जमिनीचा प्रश्न निकाली लागणार असून तोपर्यंत देवस्थान इनाम जमिनीतील घर दुरूस्तीला कोणतीही अडचण येणार नाही, याकरीता आपण प्रशासनाशी चर्चा करणार असल्याचेही आमदार किरण सामंत यांनी सांगितले. नगरपरिषदेचे उत्‍पन्न वाढीच्या दृष्टीने नगरपरिषदेने आवश्‍यक निर्णय घ्‍यावे अशाप्रकारच्‍या सूचनाही आमदार किरण सामंत यांनी यावेळी केल्या.

यावेळी आमदार किरण सामंत यांनी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील धरणाच्या कामाचा तसेच नव्याने सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची माहिती घेतली. नव्या पाणीपुरवठा योजनेच्या डीपीआरमध्ये काही प्रमाणात त्रुटी असल्याचे यावेळी नगराध्‍यक्ष व नगरसेवक यांनी आमदार किरण सामंत यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी याबाबत संबंधित अधिकारी, ठेकेदार यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेवून डीपीआर मध्ये असलेल्या सर्व त्रुटी दुरूस्त करणेबाबत चर्चा करुन त्रुटी दूर करण्‍याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी झालेल्या चर्चेत नगरसेवक अॅड. जमीर खलिफे, सौरभ खडपे, दिलीप चव्हाण आदी नगरसेवकांनी सहभाग घेतला. या बैठकीला शिवसेना तालुकाप्रमुख दिपक नागले, अॅड. यशवंत कावतकर यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरीक उपस्थित होते .

Breaking News

बेनगी वारिकवाडीच्या ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केला जाहीर प्रवेश

बेनगी वारिकवाडीच्या ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत...