कोकणातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत आणि लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण ऊर्फ भैय्या सामंत यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी आयोजित केली विशेष बैठक.
कोकणातील आंबा काजू शेतकऱ्यांना आज दिलासा मिळण्याची शक्यता–
मुंबई – कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी तसेच व्यापाऱ्यांच्या विविध समस्या आणि नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.
कोकणातील आंबा-काजू हंगामात झालेल्या नुकसानी बाबत, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, बाजारपेठेतील प्रश्न तसेच व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि लांजा- राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री यांनी तातडीने ही बैठक बोलावली आहे.
या बैठकीत आंबा-काजू उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, कोकणातील शेतकरी व व्यापाऱ्यांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे…
