रत्नागिरीनगर राजभाषा कार्यान्वयन समितीच्या वतीने जागतिक हिंदी दिनानिमित्त हिंदी कवी संमेलन उत्साहात

नगर राजभाषा कार्यान्वयन समितीच्या वतीने जागतिक हिंदी दिनानिमित्त हिंदी कवी संमेलन उत्साहात

नगर राजभाषा कार्यान्वयन समितीच्यावतीने
जागतिक हिंदी दिनानिमित्त हिंदी कवी संमेलन उत्साहात
रत्नागिरी,  (जिमाका)- जागतिक हिंदी दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी शहरात नगर राजभाषा कार्यान्वयन समितीच्यावतीने तृतीय भव्य हिंदी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय तटरक्षक अवस्थान यांच्या यजमानपदाखाली पार पडलेल्या या संमेलनात कवींच्या विविध साहित्याने रसिक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि कवींच्या श्लोक पठणाने झाली. यावेळी व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष नरेंद्र रघुनाथ देवरे, भारतीय तटरक्षक दलाचे कमान अधिकारी समादेशक शैलेश गुप्ता, कोकण रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट, सीमा शुल्क कार्यालयाचे उपायुक्त संदीप कृष्णा आणि डॉ. प्रा. शाहू मधाले उपस्थित होते.
या संमेलनात एकूण १२ कवींनी आपल्या विशिष्ट शैलीत हिंदी कवितांचे सादरीकरण केले. यामध्ये देशप्रेम, सामाजिक वास्तव आणि मानवी संवेदनांचे दर्शन घडले. मोहन सिंह नरूका भारतीय तटरक्षक वायू अवस्थान, नेत्रा वाघुलदे भारतीय जीवन विमा निगम (LIC), धनराज जाधव बँक ऑफ इंडिया, दीप्ती पंडित भारत संचार निगम लिमिटेड, प्रणाली प्रमोद गमरे कॕनरा बँक, सौम्या भार्गव बँक ऑफ इंडिया, अयुब खान आकाशवाणी, ललित प्रकाश दीपस्तंभ, अनिल बलयान बँक ऑफ इंडिया, अमृता विजय नरसाळे भारतीय तटरक्षक, कुलदीप भारतीय तटरक्षक वायू अवस्थान यांनी या कवी संमेलनात सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित प्रकाश आणि डॉ. मधाले यांनी अतिशय खुमासदार पद्धतीने केले. उपस्थित मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी आणि समितीचे सदस्य सचिव रमेश गायकवाड यांनी केले, तर चंद्रकांत कुमार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
गेली २२ वर्षे रत्नागिरीत हिंदी भाषेच्या प्रचारासाठी कार्यरत असलेल्या या समितीचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Breaking News