रत्नागिरीजागतिक हिवताप दिन – २५ एप्रिल २०२६

जागतिक हिवताप दिन – २५ एप्रिल २०२६

जागतिक हिवताप दिन – २५ एप्रिल २०२६
“हिवताप दुरीकरणासाठी कटिबद्ध – आता हे शक्य आहे, आता हे केलेच पाहिजे”
दरवर्षी २५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जनतेमध्ये किटकजन्य आजारांबाबत, विशेषतः हिवतापाबाबत जनजागृती करण्यात येते. शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन प्रभात फेरी काढण्यात येते तसेच सर्व आरोग्य संस्थांमार्फत ग्रामीण भागात हिवताप विषयक आरोग्य शिक्षण दिले जाते.
आज जगातील सुमारे निम्मी लोकसंख्या किटकजन्य आजारांच्या छायेखाली आहे. रोगकारक जंतूंचा प्रसार करणाऱ्या किटकांमध्ये मुख्यत्वे डासांचा समावेश होत असला तरी जसे सांडसाव, पिसवा, ढेकूण, गोचीड तसेच सँडफ्लाय या प्रकारच्या किटकांपासून वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर आजार पसरतात. जगातील जवळपास ८७ देशांमध्ये हिवतापाची समस्या आढळते. आजही दरवर्षी जगभरात हिवतापामुळे सुमारे ६ लाख लोकांचा मृत्यू होतो. एडीस डासामुळे पसरणारा डेंग्यू हा आजार मागील ५० वर्षांत जगभरात सुमारे ३० पटांनी वाढला आहे. वाढते शहरीकरण, आंतरराष्ट्रीय दळणवळण, वातावरणातील बदल आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे भूजलाचा वाढता वापर यामुळे जगभरात दरवर्षी सुमारे ५ लाख लोकांना डेंगी आजारामुळे रुग्णालयात भरती व्हावे लागते, यापैकी सुमारे २.५% लोकांचा मृत्यू होतो. याशिवाय ३०% पेक्षा अधिक मृत्युदर असणारे जपानी मेंदूज्वर, चांदीपूर मेंदूज्वर यासारखे आजारही तुरळक स्वरूपात आढळतात.
किटकजन्य रोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. राज्यात गावपातळीवर आरोग्य सेवक आणि सेविका यांच्या माध्यमातून नियमित तापरुग्ण सर्वेक्षण करण्यात येते. बहुतेक साथरोग पावसाळ्यात वाढत असल्याने संपूर्ण राज्यभर जिल्हा तसेच क्षेत्रीय स्तरावर मान्सूनपूर्व साथरोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी तयारी केली जाते. याअंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण, जोखमीच्या गावांकडे विशेष लक्ष, डासोत्पत्ती स्थानांची नोंद तसेच साथरोग कक्षांची स्थापना आदी उपाययोजना केल्या जातात.
दरवर्षी जून महिना “हिवताप विरोधी महिना” म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात किटकजन्य आजार प्रतिबंधक विविध उपाययोजना, आरोग्य शिक्षण आणि लोकसहभाग यावर विशेष भर दिला जातो. डासांमुळे पसरणाऱ्या आजारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित स्वरूपात किटकशास्त्रीय सर्वेक्षण केले जाते. पाण्याचे साठे तपासून त्यामध्ये अळीनाशक द्रावण टाकले जाते तसेच आवश्यकता भासल्यास पाणीसाठे रिकामे करण्यात येतात.
राज्यात डेंग्यू आणि चिकुनगुनिया आजाराच्या निदानासाठी २३ सेंटिनल प्रयोगशाळा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. या प्रयोगशाळांमध्ये डेंग्यू/चिकुनगुनियाचे त्वरीत निदान करण्यात येते. रुग्णांना पुरेसा औषधसाठा आणि योग्य औषधोपचार उपलब्ध करून दिला जातो.
डास प्रतिबंधासाठी एकात्मिक कीटक व्यवस्थापन राबविले जाते. यामध्ये परिसर अभियांत्रिकी, कीटकनाशक फवारणी, अळीनाशकांचा वापर तसेच जैविक प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये गप्पी माशांचा वापर अशा विविध उपायांचा समावेश आहे. शहरी भागात स्रोत नाश (Source Reduction) तत्त्वावर भर देत सिव्हिक बायलॉजची अंमलबजावणी केली जाते, ज्यामध्ये लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे.
उद्रेकग्रस्त भागात धूरफवारणी (Fogging) केली जाते. ए.पी.आय. २ टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या गावांमध्ये कीटकनाशक फवारणीच्या दोन फेऱ्या घेतल्या जातात. पहिली फेरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होते, तर दुसरी फेरी ऑगस्ट महिन्यात घेतली जाते.
शहरी भागांसाठी विशेष उपाययोजना म्हणून साप्ताहिक अळीनाशकाचा वापर आणि बांधकाम तसेच विकास कामांवरील मजुरांचे नियमित सर्वेक्षण केले जाते. सर्व किटकजन्य रोगांच्या प्रभावी प्रतिबंधासाठी नगरविकास, ग्रामविकास, पाणीपुरवठा विभाग तसेच शालेय शिक्षण विभाग यांच्याशी नियमित समन्वय राखला जातो.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येक ग्राम आरोग्य, स्वच्छता व पोषण समितीमार्फत मिळणाऱ्या निधीपैकी १५ टक्के निधी किटक व्यवस्थापनासाठी खर्च करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
किटकजन्य आजार नियंत्रणासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचू न देणे आणि आठवड्यातून एक दिवस “कोरडा दिवस” पाळणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

-(डॉ.संतोष यादव),
जिल्हा हिवताप अधिकारी
रत्नागिरी

Breaking News

नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार : पालकमंत्री ना. नितेश राणे

नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार : पालकमंत्री ना....

नेहमी प्रमाणे रत्नागिरी नगरपरिषद पाणी पुरवठा येत्या सोमवारी राहणार बंद

नेहमी प्रमाणे रत्नागिरी नगरपरिषद पाणी पुरवठा येत्या सोमवारी राहणार...