आंबा घाटात कोळशाने भरलेल्या ट्रकच्या केबिनला आग; स्थानिक यंत्रणेच्या तत्परतेने आग विझवून मोठी दुर्घटना टळली-
भरत माने/साखरपा
👉रत्नागिरी-नागपूर महामार्ग (एनएच-66) वरील आंबा घाट परिसरात शनिवारी पहाटे कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या केबिनला आग लागल्याची घटना घडली. महामार्ग पोलीस, अग्निशमन दल व स्थानिकांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले असून मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, चालक शंभू चरण यादव (वय 48, रा. हजारीबाग, झारखंड) हे एमएच-09-एफएल-9047 क्रमांकाच्या 14 टायर ट्रकमधून 31 टन कोळसा घेऊन जयगड येथून उंब्रज (जि. सातारा) येथे जात होते. पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास आंबा घाटातील गणेश मंदिराच्या पाठीमागे रत्नागिरीच्या दिशेने सुमारे एक किलोमीटर अंतरावर ट्रकच्या केबिनमध्ये ओव्हरहिटिंगमुळे वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र हातखंबा येथील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिपाली जाधव, पीएसआय पाटील, जीपीएसआय सावंत, पोलीस कर्मचारी वाकरे, लांबोरे, दाभाडे, संकपाळ, शिवलकर तसेच चालक कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याशिवाय साखरपा पोलीस दूरक्षेत्रातील हेड कॉन्स्टेबल जाधव यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला.
आंबा गावातील मृत्युंजदूत विजय पाटील व त्यांची टीम, देवरुख पोलीस स्टेशनचे कर्मचारी, महामार्गावरील इतर वाहनचालक तसेच देवरुख नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या सहकार्याने आग आटोक्यात आणण्यात आली.
या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसून ट्रक रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे उभा करण्यात आला आहे. आंबा घाटातील वाहतूक सुरळीत सुरू असून घटनेचा अधिक तपशीलवार अहवाल तयार करण्यात येत असल्याची माहिती महामार्ग पोलीस मदत केंद्र हातखंबा यांच्या वतीने देण्यात आली.
