नवीदिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आज पहाटे ५.३६ वा. शक्तीशाली भूकंपाने हादरली आहे. दिल्लीकर साखरझोपेत असताना धरणी कंपनाने त्यांची पळापळ झाली. दिल्लीत झालेल्या भूकंपाची तीव्रता 4.0 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली आहे. हादरे बसल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर पळ काढत मोकळ्या जागी आसरा घेतला. भूकंपासोबतच जोरदार आवाजही झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केलवर ४.० इतकी मोजली गेली, त्याचे केंद्र दिल्लीच्या आसपास जमिनीपासून ५ किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे दिल्लीला जोरदार धक्के जाणवले. काही सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की इमारतींच्या आत जोरदार कंपने जाणवू लागली. पहाटे ५.३६ वाजता हा भूकंप झाल्याची माहिती आहे, त्यामुळे लोकांची झोप उडाली. दिल्ली-एनसीआर तसेच शेजारील राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे. सुदैवाची बाब म्हणजे सध्या कुठूनही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही.
दिल्ली-एनसीआर भूकंपाच्या झोन IV मध्ये येते, ज्यामुळे येथे मध्यम ते तीव्र भूकंपाचा धोका असतो. दिल्ली एनसीआरमध्ये वेळोवेळी भूकंपाचे धक्के जाणवत असतात. मात्र या तीव्रतेचे धक्के बऱ्याच दिवसांनी जाणवले आहेत. अनेक दशकांनंतर भूकंपाचा केंद्रबिंदूही दिल्लीजवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं की, “दिल्ली आणि आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. प्रत्येकाला शांत राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करण्याचे आवाहन आहे. तसेच संभाव्य आफ्टरशॉकसाठी सतर्क राहावे. अधिकारी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.