रत्नागिरीरत्नागिरीत शिवसेनेची 'आभार यात्रा' जाहीर सभा हजारोंच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न--

रत्नागिरीत शिवसेनेची ‘आभार यात्रा’ जाहीर सभा हजारोंच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न–

रत्नागिरीतल्या २० हजार युवांना रोजगार मिळणार – पालकमंत्री उदय सामंत–

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला आजवरच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी दिला नाही, तेवढा निधी मागील अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांनी दिला. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा कायापालट व्हायला सुरुवात झाल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले. शिवसेनेच्या आभार मेळाव्यात ते बोलत होते.

शिवसेनेच्या वतीने रत्नागिरीच्या चंपक मैदानावर आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, निलेश राणे, राजन साळवी, सुभाष बने, राजेंद्र महाडिक, रचना महाडिक, रोहन बने, विलास चाळके, शिवसेना सचिव संजय मोरे, शशिकांत चव्हाण यांच्यासह मोठ्या कार्यकर्ते, नेते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट ९५ टक्के
एकनाथ शिंदेंनी देशात पहिल्यांदाच बहिणींना मान-सन्मान मिळवून दिला. त्या भगिनी हजारोंच्या संख्येने एकनाथ शिंदेंना आशिर्वाद देण्यासाठी आल्याचे उदय सामंत यावेळी म्हणाले. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचा विधान सभेला स्ट्राईक रेट हा ९५ टक्के होता. लढलेल्या जागेपैकी राजेश बेंडल यांचा एकमेव पराभव वगळता सर्वच जागा शिवसेना जिंकलेली आहे. बेंडल पराभूत झाले असले तरी ते शिवसेनेसाठी आमदारच असल्याचे सामंत यावेळी म्हणाले.

…म्हणून आभार मेळावा
विधानसभा निवडणुकीत सगळ्यांनीच शिवसेनेला भरभरून आशिर्वाद दिले होते. त्या आशिर्वादाची जाणिव ठेवूनच आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे आज रत्नागिरीत आले आहेत. मागील अडीच वर्षात एकनाथ शिंदेंनी आमच्या कुठल्याही मतदार संघात एकही रुपयाचा निधी कमी पडू दिला नसल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.

रत्नागिरीवासियांची स्वप्नपूर्ती
वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयचे रत्नागिरीवासियांचे स्वप्न देखील आता पूर्ण झालेले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातले पहिले संशोधन केंद्र १५ कोटी रूपये खर्च करून रत्नागिरीत होत आहे. त्यामुळे या केंद्राच्या उद्घाटनासाठीही ६ महिन्यानंतर तुम्हाला पुन्हा यावे लागेल, असे निमंत्रणही यावेळी पालकमंत्री उदय सामंतांनी यावेळी एकनाथ शिंदेंना दिले.

२० हजार युवांना रोजगार
देशातला पहिला थ्रीडी मल्टिमीडिया शो देखील रत्नागिरीमध्येच होतो आहे. ज्या चंपक मैदानावर आभार मेळावा भरविण्यात आला होता. ते मैदान एमआयडीसीच्या मालकीचे आहे. याच ठिकाणी व्हीआयपी सेमी कंडक्टर कंपनीचा १९ हजार ५०० कोटी रुपयांचा प्रकल्प उभारला जाणार आहे. याप्रकल्पातून रत्नागिरीत सुमारे २० हजार युवांना रोजगार मिळणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगताच, उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला. रत्नागिरी जिल्ह्यात औद्योगिक क्रांती करण्याची भूमिका ही एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचे सामंत यांनी आवर्जून सांगितले. आमच्या प्रत्येकाच्या मतदारसंघात बळ देण्याचे काम शिंदेंनी आजवर केल्याचेही सामंत यांनी सांगितले. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली जनतेनं आम्हांला पुन्हा एकदा विधानसभेत पाठवल्याचेही सामंत यावेळी म्हणाले.

रत्नागिरी जिल्हा परिषदेवरही भगवाच फडकेल – उदय सामंत
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीतल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंचा उल्लेख कार्यसम्राट मुख्यमंत्री म्हणून केला. त्यामुळे काहींचा पोटशूळ उठला. दिल्लीतल्या पत्रकारांनीही मला असा सत्कार पहिल्यांदाच बघितल्याचे सांगितले. त्यामुळे ज्यांचा पोटशूळ उठला होता, त्यांना आज झालेले पक्षप्रवेश हे उत्तर असल्याचा टोमणाही सामंत यांनी विरोधकांना लगावला. विरोधकांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम होणार आहे. प्रवेशाचा अजून एक टप्पा शिल्लक आहे तो देखील महिनाभरामध्ये पूर्ण होईल, असेही सामंत यांनी सांगितले. व्यासपीठावरील नेते मंडळी आणि जनतेच्या आशिर्वादाने रत्नागिरी जिल्हा परिषदेवरही भगवाच फडकेल, असा विश्वास पालकमंत्री सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.

एकनाथ शिंदेंनी रत्नागिरीला भरघोस निधी दिला
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातली रखडलेली सर्व विकासकामे झाले. मागील अडीच वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात जी विकासकामे झाली ती मागील पन्नास वर्षात झाली नव्हती. आजवरच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी एवढा निधी दिला नव्हता, एवढा हजारो कोटींचा निधी एकनाथ शिंदेंनी दिला.

लाडक्या बहिणींचाही सन्मान
आभार मेळाव्यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी उपस्थित महिलांना फेटे बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला होता. लाडक्या बहिणी आणि भावांनी केलेल्या मतदानामुळेच महायुतीचे सरकार आले. एकनाथ शिेंदेंच्या नेतृत्वाखालीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. सूर्य, चंद्र असेपर्यंत ही योजना सुरूच राहणार आहे, अशी ग्वाही देखील पालकमंत्री सामंत यांनी दिली.
विकासाची दिशा देणाऱ्या नेत्याच्या पाठीमागे ठामपणाने उभे राहण्याची भूमिका स्विकारत आज शिवसेनेत कार्यकर्ते-नेत्यांनी प्रवेश केला. सगळ्यांच्या कर्तृत्वानुसार पदे आणि जबाबदारी त्यांना दिली जाईल, असेही पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण एकसंघपणाने लढल्यास, शिवसेनेला कुणीही भेदू शकत नाही, एवढी ताकद रत्नागिरीच्या शिवसेनेत आहे, असेही पालकमंत्री सामंत म्हणाले. एकनाथ शिंदे यांना मोठं करण्यासाठी जे काही करावे लागेल, ते करण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Breaking News