भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएन एस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे…. मंत्री नामदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, ही नौका आता लोकांसाठी खुली होणार आहे. यामुळे सिंधुदुर्गमधील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.
विजयदुर्ग बंदरासाठी विशेष प्रयत्न
विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या माध्यमातून विजयदुर्गवासीयांनी नामदार नितेश राणे यांच्याशी संपर्क साधला होता. समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे बंदर व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट घेतली. त्यांनी या नौकेला विजयदुर्ग बंदरात आणण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते. अखेर, त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही नौका विजयदुर्ग बंदरासाठी मिळवण्यात यश आले आहे.
पर्यटन वाढीस लागणार मोठा हातभार
ही नौका पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक विजयदुर्गला येणार आहेत. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होणार आहे. नौकेचे स्थलांतर कर्नाटक येथील बंदरातून करण्यात येणार असून, पर्यटन महामंडळाने त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच ही नौका विजयदुर्ग बंदरात दाखल होईल.
आईएनएस गुलदार: एक शक्तिशाली युद्धनौका
भारतीय नौदलाच्या लँडिंग शिप टँक (मध्यम) श्रेणीतील आईएनएस गुलदार हे जहाज, त्याच्या सामरिक क्षमतांमुळे, नौदलाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.
महत्त्वाची वैशिष्ट्ये:
नौदलात समावेश: ३० डिसेंबर १९८५
विस्थापन: १,२०० टन
लांबी: ८१ मीटर
रुंदी (बीम): १० मीटर
सक्षम अधिकारी व कर्मचारी: ६ अधिकारी आणि ८५ खलाशी
वाहन क्षमता:
चिलखती कर्मचारी वाहक
रणगाडे (टँक)
स्वयं-चालित तोफा
ट्रक
१५० पेक्षा अधिक सैन्य
सामरिक सामर्थ्य आणि संरक्षण
आईएनएस गुलदार अत्याधुनिक ३० मिमी क्लोज-रेंज गन आणि रॉकेट लाँचर्सने सुसज्ज आहे. हे जहाज विविध नौदल मोहिमांमध्ये प्रभावीपणे सहभागी झाले आहे.
आपत्ती निवारण आणि मानवी मदत कार्य
युद्धसज्जतेव्यतिरिक्त, हे जहाज नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत कार्य, अडकलेल्या नागरिकांची सुटका, आणि आपत्कालीन साहित्य वितरणा साठीही वापरले जाते.
गुलदार: नावाचा अर्थ आणि नौकेचा सागरी अभिमान
“गुलदार” हे नाव भारतीय बिबट्याच्या (गुलदार) प्रजातीवरून ठेवण्यात आले आहे, जे नौकेच्या वेग, ताकद आणि चपळतेचे प्रतीक आहे.
नौकेचा सागरी क्रेस्ट:
भारतीय बिबट्याचे चित्रण: वालुकामय समुद्रकिनाऱ्यावर हिरव्या पार्श्वभूमीवर तपकिरी रंगात
महासागराच्या लाटा: निळ्या आणि पांढऱ्या रंगात, जहाजाच्या सागरी सामर्थ्याचे प्रतीक
बोधवाक्य – “प्रथम आणि निर्भय”
आईएनएस गुलदार “प्रथम आणि निर्भय” या बोधवाक्याला साजेसे कार्य करत, भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात मोलाची भर टाकते.
विजयदुर्गसाठी नव्या पर्वाची सुरुवात
भारतीय नौदलाचे आईएनएस गुलजार हे केवळ युद्धनौका नसून, सागरी संरक्षण, सामरिक सामर्थ्य आणि मानवतावादी सेवांचे एक प्रेरणादायी प्रतीक आहे. लवकरच ही नौका विजयदुर्ग बंदरात दाखल होईल, ज्यामुळे या ऐतिहासिक ठिकाणाचे महत्त्व आणखी वाढेल.