छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे जे या भुतलावर ‘न भुतो न भविष्यती’ पुन्हा होणार नाही.. छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण, त्यांचे विचार आणि त्यांचे आचरण अन् लौकिक असा की, जगात असा राजा झाला नाही ना होणार. शिवरायांचे दिव्य तेज, चाणाक्ष नजर आणि वेळेवरील निर्णयक्षमता, गनिमी कावा असो की, अष्टप्रधान मंडळ अशा अनेक गोष्टी शिवरायांच्या गौरवात सांगायच्या झाल्या तर कमीच पडतील..*
अलीकडे जातीय दंगली अन् हिंदु मुस्लीम यांच्यातील बेबनाव उफाळून आल्याचे अनेक घटनांवरुन दिसते, पण सांगायचे झाले तर शिवरायांनी जातीयतेचा विचार कधीच केला नाही. त्यांनी नेहमी स्वराज्य, स्वराज्यातील जनता आणि सर्वधर्म समभावाची शिकवण त्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्माचा सन्मान करायचे, सर्व धर्मसमभावाचे,बंधुत्व अन् माणुसकीचे ते प्रतिक आहे.
शिवरायांचे मानवतेचे धोरण
शिवाजी महाराजांचे मानवतेचे जे धोरण अवलंबवलं होतं ते कोणत्याही धर्मावर आधारीत नव्हतं. ते त्यांचे प्रेरणादायी संस्कार आणि उदात्त विचारांवर आधारीत होतं. शिवरायांच्या स्वराज्यात असंख्य मुस्लीम सैनिक तर होतेच पण सरदारही तब्बल 123 होते.
शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवरायांना प्रामाणिकपणे मदत केली. त्यामध्ये स्वकीय मुस्लिम होते. तसेच शत्रूकडील मुास्लिम देखील होते. त्यांनी शिवरायांना युद्धात मदत केली. सुख-दु:खात मदत केली. शिवरायांचे नेतृत्व त्यांनी आनंदाने आणि निरपेक्ष भावनेने मानले. शिवरायांच्या पदरी असणारे निष्ठावंत व नेक दिलाचे इमानदार मुस्लिममावळे पाहिल्यावर तसेच तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास केल्यावर उपरोक्त प्रतिमेचे खंडन होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे 10 मुस्लीम साथीदार
- सिद्दी अंबर वहाब – हे हवालदार होते. 1647 साली कोंडाणा किल्ला जकिंण्यास सिद्दी अंबरने राजास मदत केली
- नूरखान बेग – हे शिवरायांच्या सैन्याचे पहिले सरनोबत होते. त्यांनी स्वराज्य उभारणीसाठी शत्रूबरोबर प्राणपणानेला लढा दिला.
- सिद्दी इब्राहीम – हे शिवरायांचे अंगरक्षक होते. अंगरक्षक हे सर्वात महत्त्वाचे पद असते. अशी महत्त्वाची जबाबदारी ज्या अंगरक्षकांकडे होती त्यामध्ये सिद्दी इब्राहीम एक होते.
- सिद्दी हिलाल : हे शिवरायांच्या घोडदलात सेनापती होते. शिवाजीराजे पन्हाळा येथे अडकले असताना राजांच्या सुटकेसाठी सिद्धी हिलालने सिद्दी जौहर बरोबर लढा दिला. उमराणीजवळ प्रतापरावांच्या सोबत बेहलोलखानाशी लढा दिला.
- सिद्दी वाहवाह : हे सिद्दी हिलालचे पुत्र असून वडिलांच्यासोबत ते शिवरायांच्या सैन्यात होते. सिद्दी जौहरशी लढताना ते जखमी झाले, त्यांना कैद करण्यात आले. शिवरायांची सुटका व्हावी, यासाठी या युवकाने प्राण गमावले, पण सिद्दी जौहरला शरण गेला नाही.
- रुस्तुमेजमान : रुस्तुमेजमान हे शहाजीराजांचे जिवलग मित्र रनदुल्लाखान यांचे पुत्र होते. तसेच ते शिवाजीराजांचे आदिलशाही दरबारातील जिवलग मित्र होते. अफ जलखान ठार मारण्याच्या इराद्याने निघालेला आहे. ही खात्रीलायक बातमी राजांना प्रथम रुस्तुमेजमानने सांगितली. रुस्तुमेजमानने राजांना हुबळीच्या ल्यात मदत केली. तसेच सिद्दी मसऊदच्या संकटाची बातमी राजांना प्रथम रुस्तुमे जमाननेच सांगितली. रुस्तुमे जमानने राजांना प्रामाणिक मदत केली व स्वराज्य उभारणीस हातभार लावला.
- मदारी मेहत्तर : मदारी मेहत्तर हे राजांचे विश्वासू मित्र होते. 17 ऑगस्ट 1663 रोजी आग्राच्या सुटकेप्रसंगी मदारीने प्राण धोक्यात घालून राजांना मदत केली. त्यात मदारी पकडले गेले. औरंगजेबाच्या सैनिकांनी मदारीला पाट फुटेपर्यंत मारले पण मदारीने राजे कोठे गेले सांगितले नाही. अशा निष्ठावान मित्राला राजांनी स्वराज्यातील उच्चपद घेण्याचा आग्रह केला. तेव्हा मदारीने विनम्रपणे नकार दिला आणि सिंहासनावरची चादर बदलण्याचे काम घेतले.
- काझी हैदर : हे शिवरायांचे 1670 ते 1673 पर्यंत वकील होते. त्यानंतर राजांचे खाजगी सचिव झाले. फारसी पत्रलेखनाची जबाबदारी राजांनी त्यांचेवर सोपविली. वकील, सचिव, पत्रलेखक इत्यादी महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळणारे काझी हैदर राजांचे विश्वासू होते.
- शखा खान : हे शिवरायांचे सरदार होते. मोगलांचे किल्ले ताब्यात घेण्यासाठी शखाखानने प्राणाची बाजी मारली.
- दौलतखान : हे शिवरायांच्या आरमारदलाचे प्रमुख होते, त्यांनी 1680 साली उंदेरीवर हल्ला केला. पराक्रम गाजविला. 1674 साली सिद्धी संबुलचा पराभव केला.