फळे व भाजीपाल्यापासून मूल्यवर्धित उत्पादन निर्मितीचे प्रात्यक्षिक
मांडकी खुर्द, तालुका. चिपळूण, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषीभूषण डॉ. तानाजी चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण यांच्या ग्रामीण जागरूकता व कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) अंतर्गत कृषिकन्यांनी फळे व भाजीपाल्यापासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याबाबत प्रात्यक्षिक आयोजित केले होते.
या प्रात्यक्षिकामध्ये मिक्स फ्रूट जॅम तयार करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष करून दाखविण्यात आली. यामध्ये आवश्यक साहित्य, फळांची निवड, जॅम तयार करण्याची पद्धत तसेच त्याचे साठवण व पॅकिंग याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.
फळे व भाजीपाल्याचे मूल्यवर्धित उत्पादन केल्यामुळे शेतमालाची नासाडी कमी होते, उत्पादनाला अधिक बाजारमूल्य मिळते आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते, याबाबत कृषिकन्यांनी मार्गदर्शन केले.
हे प्रात्यक्षिक प्रा. रोहन मोहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यावेळी कृषी स्पंदन परिवारातील कृषिकन्या आदिती शिर्के, समिक्षा सावंत, करीना कांबळे, वैभवी माने व उत्कर्षा कांबळे तसेच गावातील महिला शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी कृषिकन्यांचे कौतुक केले व अशा उपक्रमांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना मूल्यवर्धित उत्पादन निर्मितीची प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त केले.
