मजगाव येथील बरकतअली अब्बास मुकादम यांनी सलग 15 व्यांदा तंटामुक्त अध्यक्ष पदी बिनविरोध निवड होण्याचा केला आगळावेगळा विक्रम— अनेकांनी अभिनंदन करीत दिल्या शुभेच्छा
👉 रत्नागिरी तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या मजगाव गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी श्री. बरकतअली अब्बास मुकादम यांची सलग 15 व्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या विक्रमी निवडीमुळे संपूर्ण गावात अभिमानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. बरकतअली मुकादम यांनी मजगांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राहून ही गांवाच्या विकासासाठी योगदान या पूर्वी दिलेले आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत मजगाव गावाने गेल्या अनेक वर्षांपासून भांडणमुक्त आणि एकोप्याचा आदर्श निर्माण केला आहे. यामध्ये अध्यक्ष म्हणून बरकतअली मुकादम यांनी बजावलेली भूमिका अत्यंत मोलाची आहे. गावातील किरकोळ वाद, कौटुंबिक कलह, जमिनीचे वाद सामोपचाराने आणि कायद्याच्या चौकटीत सोडवण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे गावातील एकही प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत जात नाही.
त्यांच्या या कार्याची दखल घेत ग्रामस्थांनी, ग्रामपंचायतीने आणि पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. या 15 वर्षांच्या काळात त्यांनी गावात शांतता, सलोखा आणि बंधुभाव टिकवून ठेवला आहे.
निवडीनंतर बोलताना बरकतअली मुकादम म्हणाले, “ही निवड माझी नसून मजगावच्या एकीची निवड आहे. गावकऱ्यांनी माझ्यावर 15 वेळा दाखवलेला विश्वास हीच माझी खरी संपत्ती आहे. यापुढेही गाव तंटामुक्त आणि विकासाभिमुख ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.”
यावेळी प्रशासक फय्याज मुकादम , माजी उपसरपंच शरीफ इब्जी , माजी ग्रा.प. सदस्य हुसैन टेमकर , मुझफ्फर मुकादम, ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी अर्चना कळबटे , मजगांव उर्दू शाळा मुख्याध्यापिका , मजगांव पोस्टमास्टर सायली गोरे, अंगणवाडी सेविका नफीसा नाखवा , जिक्रिया मुजावर , समीना मुकादम, आशा ताई , बचत गट प्रमुख नुझहत नाकाडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी त्यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
