अभियंता दिनानिमित्त सबोर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे ए. के. देसाई विद्यालयात विद्युत बचत व सुरक्षेबाबत जनजागृती–
👉रत्नागिरी – अभियंता दिनाचे औचित्य साधून सबोर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन, रत्नागिरी यांच्या वतीने ए. के. देसाई विद्यालय, रत्नागिरी येथे विद्यार्थ्यांसाठी विद्युत बचत, विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती तसेच सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना “वीज बचतीचे महत्त्व” तसेच “विद्युत उपकरणे हाताळताना घ्यावयाची सुरक्षिततेची खबरदारी” या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. विजेचा अनावश्यक वापर टाळणे, वीज बचतीच्या सवयी अंगीकारणे तसेच विद्युत उपकरणे वापरताना घ्यावयाच्या आवश्यक सुरक्षा उपाययोजनांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
अभियंता दिनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत असोसिएशनच्या वतीने निवडक विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यास प्रोत्साहन मिळावे आणि शाळेत योगाभ्यासास चालना मिळावी, या उद्देशाने विद्यालयास योगा मॅट्स भेट देण्यात आल्या.
या कार्यक्रमास सबोर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे रत्नागिरी जिल्हा सहसचिव श्री. नबील मोगल, सर्कल सचिव श्री. आशुतोष कुलकर्णी, सर्कल अध्यक्ष श्री. वैभव सावंत तसेच डिव्हिजन अध्यक्ष श्री. मुकेश बोबडे, श्रीमती गायत्री परसय्या यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक श्री. अंजली पिलणकर, शिक्षिका सौ. वृषाली सावंत तसेच श्री. संतोष गार्डी उपस्थित होते. विद्यालय प्रशासनाने या उपक्रमास उत्तम सहकार्य केले.
सबोर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन ही विद्युत क्षेत्रातील अभियंत्यांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना असून, आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्यांसोबतच समाजहिताच्या विविध उपक्रमांद्वारे जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करीत आहे.
विद्युत बचत, विद्युत सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम उत्साहात पार पडला.
