‘सेवा संकल्प अभियाना’ अंतर्गत जिल्ह्यात तालुकास्तरीय शिबिरांचे आयोजन
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत लर्निंग लायसन्स व रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम
रत्नागिरी, (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नागरिकांना शिकाऊ वाहन चालक अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) उपलब्ध करून देणे आणि रस्ता सुरक्षा जनजागृती करणे यासाठी तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिली आहे.
शासनाच्या ‘सेवा सेतू’ उपक्रमांतर्गत नागरिकांना त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणीच लर्निंग लायसन्सची सुविधा मिळावी तसेच ‘सेवा योगदान’ अंतर्गत रस्ते सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती व्हावी, या उद्देशाने ही शिबिरे घेतली जाणार आहेत.
तालुकास्तरीय शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहील:
- १७ सप्टेंबर २०२६: लांजा
- १८ सप्टेंबर २०२६: राजापूर
- २१ सप्टेंबर २०२६: गुहागर
- २२ सप्टेंबर २०२६: चिपळूण
- २३ सप्टेंबर २०२६: दापोली
- २४ सप्टेंबर २०२६: खेड
- २८ सप्टेंबर २०२६: संगमेश्वर / देवरुख
- ३० सप्टेंबर २०२६: मंडणगड
मुख्यालयात महिनाभर उपक्रम सुरु राहणार
तालुकास्तरीय शिबिरांव्यतिरिक्त, रत्नागिरी येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या जिल्हा मुख्यालयात (कुंवारबाव) हा उपक्रम १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या संपूर्ण कालावधीत (शासकीय सुट्ट्या वगळून) अखंडपणे राबविला जाणार आहे.
नागरिकांनी, विशेषतः वाहन चालविण्याचा परवाना घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी आणि नागरिकांनी, या विशेष शिबिरांचा व मोहिमेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
