GST मध्ये दिनांक २२ सप्टेंबर २०२५ पासून नवीन कर-रचना लागू होत आहे. त्यामध्ये अनेक प्रकारच्या वस्तूंवरील कराचे दर कमी करण्यात आलेले आहेत. जसे की पूर्वीच्या १८% ऐवजी ५%, पूर्वीच्या १२% किंवा ५% ऐवजी ०% वगैरे.
कराच्या दरामध्ये कोणकोणत्या वस्तूंवर किती आणि कशी दरकपात झाली आहे ते ढोबळमानाने समजून घेण्यासाठी सोबत जोडलेला तक्ता उपयोगी ठरेल. (लेखाबरोबर PDF फाईल जोडली आहे ती पहावी)
त्यावरून तुमच्या असेही लक्षात येईल की काही मोजक्या वस्तूंवर कराच्या दरात वाढही झालेली आहे.
आता नागरिकांच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट म्हणजे दि. २२ सप्टेंबर पासून त्या त्या वस्तूला लागू झालेल्या नवीन GST दरानुसारच त्या त्या वस्तूची विक्री करायची आहे. म्हणजेच ज्या ज्या वस्तूंवरील कराचे दर कमी झाले आहेत, त्या त्या वस्तू दि. २२ सप्टेंबर पूर्वीच्या किमतीपेक्षा कमी किमतीत मिळणार आहेत – स्वस्त होणार आहेत.
ज्या वस्तूंवर MRP छापलेली असते अशा वस्तूंची दि. २२ सप्टेंबर पासून विक्री करताना ग्राहकाला बदललेल्या GST दराचा फायदा देणे कायद्यानुसार बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे अशा MRP वाल्या वस्तूंची विक्री करताना बदलेल्या करदरानुसार कमी केलेल्या MRP ने विक्री करणे बंधनकारक केले आहे, ही बाब अत्यंत महत्वाची आहे. २१ सप्टेंबर पूर्वी मार्केटमध्ये आलेल्या मालाच्या पॅकिंग वर छापलेली MRP जरी जुनी असेल तरी नवीन कमी झालेल्या दराने विक्री करणे कायद्याने बंधनकारक आहे हे सर्व ग्राहकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. असा जुना माल पॅकिंगवरील MRP न बदलता पण विक्री करताना कमी झालेल्या MRP ने विकण्यासाठी कायद्यानुसार ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यानंतर मात्र नवीन बदललेली MRP छापील असलेलाच माल विक्री करावा लागेल.
यामध्ये एखाद्या वस्तूची किंमत किती कमी होईल हे एका उदाहरणातून समजून घेऊया – पूर्वीच्या १८% GST दरामध्ये असलेल्या वस्तूची छापील MRP रु. ६५०/- आहे असे समजू.
आता असं समजू की सदर वस्तू नवीन कर-रचनेनुसार ५% दारामध्ये आली आहे. दि. २२ सप्टेंबर पासून अशा वस्तूची विक्री करताना वर उल्लेख केल्याप्रमाणे कायद्यानुसार नवीन MRP ने विक्री करणे आवश्यक आहे. सदर वस्तूची ५% GST दराने MRP रु. ५७८. ४० एवढी येते. याच दराने २२ सप्टेंबर नंतर विक्री करणे बंधनकारक आहे. म्हणजे छापलेली MRP किंमत जरी रु. ६५०/- असली, तरी ती वस्तू दि. २२ सप्टेंबर पासून रु. ५७८. ४० ला मिळेल. ही बाब ग्राहकांनी प्रकर्षाने लक्षात घ्यावी.
अधिक माहितीसाठी सोबत जोडलेला तक्ता उपयोगी ठरेल. (लेखाबरोबर PDF फाईल जोडली आहे ती पहावी)
सामान्य ग्राहकांच्या माहितीसाठी सरकार पुढील १-२ दिवसात व्यापक जाहिरात मोहीम हाती घेईल असे वाटते. तसेच पंतप्रधान श्री. मोदीजीही यासंदर्भात राष्ट्राला उद्देशून भाषण करण्याची शक्यता वाटते.
त्यामुळे ग्राहकांनी नवीन कर-रचना, त्याचे आपापल्या खरेदी किंमतीवर होणारे परिणाम, त्या अनुषंगाने घ्यावी लागणारी काळजी याची व्यवस्थित माहिती करून घेणे आवश्यक वाटते.
