रत्नागिरीअजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे अरबी समुद्रात विसर्जन

अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे अरबी समुद्रात विसर्जन

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जनसामान्यांचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांचे दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी दुर्दैवी विमान अपघातात आकस्मिक निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, त्यांच्या अस्थिकलशाचे दर्शन सोमवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित करण्यात आले होते.
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील आमदार शेखर निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयात अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील विविध भागांतून हजारो नागरिक, कार्यकर्ते व दादाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. आपल्या लाडक्या नेत्याच्या अंतिम दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते.
सकाळी १०.०० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत पार पडलेल्या या दर्शन सोहळ्यात राजकीय मतभेद विसरून सर्वपक्षीय नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, विविध सेलचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच हितचिंतक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. परिसरात अत्यंत शोकाकुल व भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
दर्शनानंतर अस्थिकलश एका शिस्तबद्ध शोकमोर्चाच्या माध्यमातून गुहागर येथे नेण्यात आला. गुहागर समुद्रकिनारी धार्मिक विधी, पूजन व मंत्रोच्चारानंतर अरबी समुद्राच्या पवित्र जलात अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विधीवत विसर्जन करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेला जनसमुदाय भावूक झाला होता. अनेकांनी अश्रूंनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.
कोकण आणि रत्नागिरी जिल्ह्याशी अजितदादांचे असलेले जिव्हाळ्याचे नाते तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान यांची आठवण उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना सर्वत्र व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी आमदार शेखर निकम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन तानाजीराव चोरगे, दापोली अर्बन बँकेचे चेअरमन जयंत जळगावकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सहकार व साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News

२२ वी राज्य बालनाट्य स्पर्धा: रत्नागिरीच्या ‘धोंड’ नाटकाचा कोल्हापूर केंद्रावर गौरव!

विदुला मुळ्येला 'रौप्यपदक' तर हर्ष नागवेकरला 'संगीत' पारितोषिक; पटवर्धन...

केंद्रीय अर्थसंकल्पात वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गसाठी ३२४४ कोटींची तरतूद

*पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती*मच्छिमार, नारळ, काजू...