रत्नागिरीअभिजित हेगशेट्ये यांचे रानवीचा माळ राज्यस्तरीय प्रसाद बन साहित्य पुरस्काराने सन्मानित

अभिजित हेगशेट्ये यांचे रानवीचा माळ राज्यस्तरीय प्रसाद बन साहित्य पुरस्काराने सन्मानित

राज्य स्तरावरील अत्यंत मानाचा मानला जाणारा प्रसाद बन वाङमयीन पुरस्कार रानवीचा माळ या अभिजित हेगशेट्ये यांच्या साहित्यकृती ला मिळाला आहे. रानवीचा माळ मधील भूमिपुत्रांच्या विस्थापनाची आणि मल्टिनॅशनलच्या दंडेलशाहीची कहाणी ही फक्त कोकणपुर्ती मर्यादित नसुन ती सार्या देशातील शेतकर्यांची आहे. शेकडो शेतकरी आत्महत्या करत आहेत.
साहित्य म्हणजे फक्त सत्याची आराधना असते, पण आज या क्षेत्रातही प्रदूषण निर्माण होऊ पाहत आहे. हे संपवण्यासाठी लेखणी हातात धरणाऱ्यांनी साहित्याचं पावित्र्य अबाधित ठेवणं हे त्यांचे कर्तव्यच आहे, असे आग्रही प्रतिपादन अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
नांदेडच्या प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या वाङ्‌मय पुरस्कार प्रदान सोहळ्यात डॉ. सबनीस प्रमुख अतिथी म्हणून बोलत हाते. यावेळी व्यासपीठावर पुरस्कार विजेते कादंबरी कार अभिजित हेगशेट्ये, ज्येष्ठ कवी, चित्रकार भ.मा. परसवाळे, प्रदीप पाटील, बाळू दुगडूमवार, प्रसाद बन वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन आणि पुरस्कार समितीचे समन्वयक तथा विख्यात लेखक प्राचार्य डॉ. सुरेश सावंत सिमा हेगशेट्ये यांची उपस्थिती होती.
आपल्या घणाघाती वैचारिक वक्तृत्वासाठी प्रसिद्ध असलेले डॉ. सबनीस पुढे म्हणाले की, आज शेतकऱ्याच्या दु:खाचं, त्याच्या मरणाचं वर्णन साहित्यिक आपल्या साहित्यातून करतात, त्यावर कविता, कादंबऱ्या लिहितात, पण शेतकऱ्यांवर ही वेळ का आणि कोणामुळे आली हे आता उजागर करण्यासाठी लेखन झालं पाहिजे. शेतकरीच का मरतो याच्या मुळाशी जाऊन लेखकांनी लिहिणे गरजेचे आहे. साहित्यामुळे संस्कृतीचे सर्व पदर शुद्ध झाले पाहिजेत, असे सांगून डॉ. सबनीस म्हणाले, की लेखकांनी आपल्या संवेदना जागृत ठेवून लिहिताना विशिष्ट चौकटीत आपली बुद्धी गहाण ठेवता कामा नये. तसं झालं तर साहित्याचे खरं आकलन होणार नाही.
बन पुरस्कार विजेते अभिजित हेगशेट्टे, प्रदीप पाटील, बाळू दुगडूमवार हे साहित्याचे आशास्थाने आहेत, असे सांगून डॉ. सबनीस यांनी पुरस्कार विजेत्यांच्या साहित्यकृतींचा गौरवाने उल्लेख केला.
भ.मा. परसावळे म्हणजे साहित्याचे खरे पूजक आहेत. त्यांचं चित्र काव्यमय आहे आणि कविता चित्रमय आहेत, असे सांगून सबनीस यांनी प्रसाद बन प्रतिष्इानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन यांच्या साहित्यसेवेची मुक्तकंठाने प्रशंसा केली. 45 देशांचा दौरा करून त्या देशांतली संस्कृती डॉ. बन यांनी आपल्या प्रवासवर्णनांतून मांडली आहे. संयोजक डॉ. सुरेश सावंत यांचा डॉ. सबनीस यांनी सात्वीक सावंत असा उल्लेख करून गौरव केला.
प्रसिद्ध चित्रकार व ज्येष्ठ कवी भ.मा. परसवाळे यांना यावेळी मातोश्री पद्‌मिनीबाई बन साधना सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी भ.मा. विचार व्यक्त करताना म्हणाले, की कुठलाही चांगला लेखक हा त्याच्या निर्मितीशी, संहितेशी प्रामाणिक असला पाहिजे, पण आज अनेक पुरस्कारांच्या बाबतीत साशंकता निर्माण व्हावी, असे वातावरण आहे. पुरस्काराच्या मागे लागणारा हा खरा लेखक, कवी होऊच शकत नाही, असे सांगून परसवाळे यांनी साहित्यक्षेत्रातल्या वाईट आणि असभ्य प्रथांवर यावेळी सणसणीत ताशेरे ओढले. जीवनात जीवाभावाचं नातं निर्माण होत नाही, तोपर्यंत खरं साहित्यच निर्माण होऊ शकत नाही. साहित्यक्षेत्र हे भावनेचं क्षेत्र आहे. संवेदनांच्या बळावर लेखक किती परकायाप्रवेश करू शकतो, त्यावर त्याचं यश आहे, असेही परसवाळे शेवळी म्हणाले.
प्रसाद बन वाङ्‌यम पुरस्कार विजेते कादंबरीकार अभिजित हेगशेट्ये यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, की कोकणातल्या उद्‌ध्वस्त होत असलेल्या भूमिपुत्रांची कथा मी रानवीचा माळ ह्या कादंबरीतून पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. आज आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे असे डावपेच आणि षडयंत्र सुरू आहेत, की एखाद्या समूहाची सवयच बदलून टाकून तिथे आपले अधिराज्य निर्माण करण्याचा कार्पोरेट फंडा सुरू झाला आहे. हे कारस्थान हाणून पाडण्याचा सर्वच स्तरावर प्रयत्न झाला पाहिजे.
प्रसाद बन वाङ्‌यम पुरस्काराचे मानकरी प्रदीप पाटील यावेळी म्हणाले, गावकळा मधून मी वसतुस्थिती समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. खेड्यातला सामान्य माणूसही कसा निर्धाराने उभा राहून मोठं काम करू शकतो, याचं चित्रण गावकळा मधून केलं आहे. आजच्या पुरस्काराने खूप आनंद झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रसाद बन वाङ्‌यम पुरस्काराचे दुसेर मानकरी बाबा आमटे यांची गीते : आकलन आणि आस्वाद या समीक्षाग्रंथाचे लेखक प्रा. बाळू दुगडूमवार म्हणाले, की आज मला मिळालेला पुरस्कार हा खऱ्या अर्थाने पूज्यनीय बाबा आमटे यांच्या वेदनामुक्तीच्या प्रतिभेला आहे. बाबांच्या सहवासात आणि आनंदवनातील त्यागातून मला बाबांचं कार्य थोडंफार समजून घेता आलं, हे माझं भागय असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
प्रास्ताविक प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन म्हणाले, की साहित्यसेवेचा गौरव करण्याचं भाग्य मला लाभलं हा माझ्या आई-वडिलांचा आशीर्वादच आहे. मनस्वी वाचकातून लेखकाचा जन्म होत असतो, मला प्रवासाची आवड आहे. 45 देश फिरताना तिथली संस्कृती, निसर्ग रेखाटण्याचा माझ्या प्रवासवर्णनातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असेही डॉ. बन म्हणाले.
प्रारंभी प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या वाङ्‌मय पुरस्कारांचे डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले. यावेळी प्रसाद बन वाङ्‌यम पुरस्कार रत्नागिरचे अभिजित हेगशेट्ये यांना त्यांच्या रानवीचा मान या कादंबरीसाठी, मातोश्री पद्‌मिनीबाई बन साधना सन्मान ज्येष्ठ कवी व चित्रकार भ.मा. परसवाळे यांना तसेच प्रसाद बन ग्रंथ गोरव पुरस्कार प्रदीप पाटील यांना गावकळा या कादंबरीसाठी तर बाळू दुगडूमवार यांना बाबा आमटे यांची गीते : आकलन आणि आस्वाद या समीक्षा ग्रंथाला प्रदान करण्यात आला.
प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन यांच्या पुन्हा यांकीजच्या देशात या प्रवासवर्णनपर ग्रंथाचे प्रकाशन यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी पुरस्कारप्राप्त ग्रंथांच्या प्रकाशकांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन कार्यक्रमाचे संयोजक ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुरेश सावंत यांनी केले, तर प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सौ. वर्षा बन यांनी आभार मानले.
कार्यक्रमास बन परिवार, प्रसाद बन वैद्यकीय प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, साहित्यिक आणि साहित्यप्रेमी रसिकांची मोठी उपस्थिती होती.

Breaking News

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 👉मुंबई, :महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी...