रत्नागिरी, (जिमाका) : अमृत परिवार सर्वेक्षण अभियान दि ८ ते २५ एप्रिल दरम्यान महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यात राबवले जाणार आहे. या कालावधीत अमृत संस्थेचे प्रतिनिधी लक्षित गटाशी संपर्क करणार आहेत. या माध्यमातून लक्षित गटातील जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत अमृत संस्थेच्या विविध योजना व उपक्रमाची माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तरी लक्षित गटातील जास्तीत जास्त व्यक्तींनी अमृतकडे अमृत च्या लक्षित गटातील परिवार /संस्था/संघटना इत्यादी यांनी नोंदणी करून याचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी (अमृत) चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.
अमृत संस्थेकडून सर्वागीण विकासाच्या आणखी कोणकोणत्या उपाययोजना/ उपक्रम राबविणे अपेक्षित आहे याबद्दल विविध व्यक्तींची मतं समजावून घेणे व त्या आधारावर नवीन आवश्यक त्या योजना तयार करणे असा दुहेरी हेतू या सर्वेक्षणातून साध्य करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजे अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग/ संस्था/ महामंडळांमार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवती व इतर उमेदवारांच्या सर्वागिण उन्नतीसाठी विविध प्रशिक्षण व उपक्रम इ. विविध कार्यक्रमाचे आयोजन करून त्या माध्यमातुन उन्नतीसाठी अमृत संस्था कार्य करते. अमृतच्या लक्षित गटामध्ये खुल्या प्रवर्गातील सद्यस्थितीत ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य (सर्वेक्षणाअंती आणखी यात वाढ होण्याची शक्यता आहे) इत्यादि अश्या २५ जातींचा समावेश आहे.
सद्यस्थितीमध्ये अमृत संस्थे मार्फत लक्षित गटाच्या सर्वागीण उन्नतीसाठी विविध योजनाची अंमलबजावणी करण्यात येते. यात मुख्यत्वे पुढील योजनांचा समावेश आहे. १. व्यक्तिमत्व विकास, २. औद्योगिक व उन्नत कौशल्य विकास, ३. रोजगारक्षम कौशल्य विकास, ४. उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसाह्य, ५. स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन, ६. वैयक्तिक व्याज परतावा योजना (उद्योग व्यवसाय वृद्धीसाठी) इत्यादी योजनांचा समावेश असून यामध्ये लक्षित गटाच्या सर्वागीण विकासासाठी मूल्यवर्धित योजना सर्व घटकातील ‘व वयोगटातील व लाभार्थ्यासाठी तयार करण्याचा मानस आहे. यासाठी लक्षित गटातील कुटुंबाची संख्या निश्चित करणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे, उपलब्ध स्थानिक संसाधने, उपलब्ध कौशल्य व आवडीनुसार विविध योजना तयार करण्यासाठी लक्षित गटातील परिवाराचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणाचा कालावधी दि. ८ ते २५ एप्रिल दरम्यान महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यात राबवले जाणार आहे. आवश्यकता वाटल्यास हा कालावधी अजून काही दिवसांसाठी वाढविण्यात येईल. त्याचप्रमाणे भविष्यामध्ये अमृत या संस्थेमार्फत वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना/ उपक्रम याची माहिती वेळोवेळी या संपर्क क्रमांकाच्या माध्यमातून सर्व संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे.
लक्षित गटातील विविध सामाजिक संस्था, संघटना, मंडळे यांच्याकडून सुद्धा त्या संबंधित समाजातील प्रतिनिधी/ प्रतिष्ठित व्यक्ती/ पदाधिकारी/ अशा व्यक्तींची प्रातिनिधिक स्वरूपामध्ये माहिती घेतली जाणार आहे.
