अयोध्या श्रीराम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची मागणी
👉अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील देणग्या व आर्थिक व्यवहारांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस समितीने या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस समितीच्या अध्यक्षा सोनलक्ष्मी वीरधवल घाग यांच्या स्वाक्षरीने संबंधित यंत्रणांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये मंदिराशी संबंधित बँक खाती, आर्थिक व्यवहार, मालमत्ता, लेखापुस्तके तसेच इतर आर्थिक नोंदींची स्वतंत्र आर्थिक व फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, या प्रकरणात चोरी अथवा आर्थिक गैरव्यवहारातून मिळालेली रक्कम, वस्तू किंवा संपत्ती शोधून ती जप्त करून कायदेशीररीत्या परत मिळवून देण्याची कार्यवाही करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणातील दोषींवर कोणत्याही प्रकारचा राजकीय, सामाजिक किंवा प्रशासकीय दबाव न ठेवता कठोर कारवाई करावी, तसेच तपासाची सद्यस्थिती व करण्यात येणाऱ्या कारवाईची माहिती पारदर्शकपणे जनतेसमोर मांडावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
श्रद्धाळूंनी श्रद्धेने दिलेल्या देणगीच्या कथित गैरव्यवहारामुळे जनभावना दुखावल्या असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी भूमिका उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस समितीने मांडली आहे.
