सह्याद्रि शिक्षण संस्था संचलित वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, असुर्डे -आंबतखोल या विद्यालयात सुरू असलेल्या संस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र याविषयी डॉ.स्वाती सोनावणे, मानसोपचार तज्ज्ञ,विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित,वालावलकर रुग्णालय,डेरवण यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी फोंडा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक,व नामवंत ज्युडो प्रशिक्षक विजयसिंह पोकळे,निवृत्त शिक्षक व ज्युडो प्रशिक्षक मोहन गुरव, अजित सुतार तसेच डेरवण रुग्णालयाच्या सुखदा पाटणे ,सारिका भुवड यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉक्टर स्वाती सोनवणे यांनी सांगितले की,हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या जीवनाचा परिचय करून घेतला की आपल्याला आदर्श व्यक्तिमत्व कसे असावे याचे अत्यंत उत्तम उदाहरण पहायला मिळते.थोर व्यक्तींची चरित्रे सुद्धा आपणाला दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरतात. त्यांचे आपण वाचन करावे व त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करावा. मोबाईल मुळे विद्यार्थ्यांची मानसिकता बदलत असलेली दिसून येत आहे.सध्याच्या युगात मोबाईल वापर हे एक व्यसन बनले आहे.मोबाईल द्वारे नको त्या वाईट,अनिष्ठ बाबी पाठवणे,पाहणे या बाबी घडत आहेत.आपल्या मेंदूची पूर्ण वाढ 20 -25 वर्ष वयापर्यंत होते. या वयात निर्णयक्षमता
राग, द्वेष, मत्सर,वाईट वाटणे,भावना यावर नियंत्रण करता येत नाही.या वयात जास्त जागरण केले जाते व व्यसने लागण्याची जास्त शक्यता असते.
मोबाईलच्या रेडिशन मुळे झोप पूर्ण होत नाही,मेंदूला विश्रांती मिळत नाही. मेंदूची झीज भरून काढण्यासाठी पुरेशा विश्रांतीची गरजअसते.लक्ष केंद्रिकरणावर परिणाम होतो परिणामी आपल्या क्षमता कमी होतात.सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे स्मरण कमी होते. अलझायमर सारखे आजार जडतात असे सांगितले.यावेळी त्यांनी लक्ष केंद्रिकरण व स्मरणशक्ती वाढीसाठी मनोरंजनात्मक पेरू चिकू हा मेमरी गेम घेतला. फोंडा विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विजयसिंह पोकळे सर यांनी संस्कार शिबीर आयोजनाबद्दल विद्यालयाचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी पोकळे सर व मोहन गुरव यांनी निवृत्तीनंतरच्या वयात सादर केलेली ज्यूदो व कराटेची प्राथ्यक्षिके यांनी उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर भाट विद्यालयाचे सगळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. बापूसाहेब जमादार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अमित राऊत यांनी सर्वांचे आभार मानले.
