रत्नागिरी:- मराठा समाजाचा कुठचाही माणूस कुणबी म्हणून घेणार नाही. आम्हाला कुणबीचं आरक्षण नको आहे. आर्थिक मागास म्हणून घटनेच्या 15 आणि 16 (4) मध्ये जी तरतूद आहे, त्यानुसार राज्य शासनाने सर्वेक्षण करून अहवाल द्यावा. मागासलेपणा आढळल्यास राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे, राज्य सरकारने तो अधिकार वापरावा, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
अखिल मराठा महासंमेलनासाठी श्री. राणे आज रत्नागिरीत होते. ते म्हणाले की, महाराष्ट्रात ३० टक्के मराठा समाज आहे. मराठा समाज एवढ्या वर्षानंतरही आज हवी तशी प्रगती करू शकला नाही. समाजात दारिद्र्यरेषेखाली मोठी संख्या आहे, बेकारी आहे. एकूणच मुंबई व महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये मराठा समाजाचा हिस्सा किंवा वाटा अल्पसा आहे. त्यामुळे आर्थिक प्रगती नोकरीपेक्षा व्यवसायाच्या माध्यमातून करावी. व्यवसाय लहान असो मोठा असो. मेहनत, परिश्रमाने आपण तो व्यवसाय यशस्वी करावा. त्यातून आर्थिक सुबत्ता येईल.
अखिल मराठा फेडरेशनतर्फे आयोजित तिसऱ्या अखिल मराठा महासंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ते म्हणाले की, मी मराठा असल्याचा मला अभिमान आहे. मराठा आरक्षणासाठी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर मी सहा महिने महाराष्ट्रात फिरून अहवाल सादर केला. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा फोन आला की, उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाचा प्रस्ताव आणू नये, असे छगन भुजबळ यांनी पत्र दिले आहे. त्यानंतर मी भुजबळ यांना फोन करून विनंती केली व आम्ही कुठल्याही समाजाचे आरक्षण मागितले नाही. आर्थिक मागास निकषावर १६ टक्के आरक्षण मागितले आहे. घटनेच्या १४ (४) व १५(४) कलमातील तरतुदीप्रमाणे आरक्षण मिळाले पाहिजे. भुजबळ यांना समजावून सांगितले. त्यानंतर बैठकीत प्रस्ताव आला. त्यावेळी विरोधात एक-दोन जण बोलले. त्यानंतर बैठकीत कोणी बोलायला तयार नव्हते, मी विषय रेटून नेला व हा प्रस्ताव संमत झाला.
श्री. राणे म्हणाले की, मराठा समाजाने शेती, नोकरी, उद्योग, समाजकारण, राजकारण आपण कुठे उभे आहोत याचे आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात १५ कोटी लोकसंख्येत मराठा समाजाची लोकसंख्या ३० टक्के आहे. परंतु आयएएस, आयपीएसमध्ये १५ टक्के युवक आहेत. दारिद्र्यरेषेखाली मराठा समाजाची लोकसंख्या २२ टक्के आहे. या सर्व बाबींचा विचार करायला हवा. फेडरेशनमधील सर्व मराठा संस्था, संघटनांना एक दिवस बोलवावे आणि शिक्षण, नोकरी, व्यवसाय, समाजाची स्थिती यावर चर्चा करून उद्दिष्ट निश्चित करावे. पुढील महासंमेलनापूर्वी ही उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू.
श्री. राणे म्हणाले, मराठा समाजातील युवकांनी वेळ वाया घालवू नये. मराठा समाजातील एखाद्या व्यक्तीने प्रगती केली तर त्याचे कौतुक करावे. त्याच्यावर संशय घेऊ नये. तेव्हा छत्रपती शिवरायांनी वय वर्षे १५ ते ४५ यामध्ये हिंदवी स्वराज्य उभे केले. मावळ्यांनी त्यांना मदत केली. पण आज मराठा पुढे गेला की त्याचे पाय ओढायला दुसरा मराठा प्रयत्न करतो. हे बदलले पाहिजे. मुंबईत मराठा किती आहे, याचा अभ्यास व्हायला हवा. मी केंद्रीय उद्योग मंत्री असताना कोकणात योजना आणल्या. पण युवकांनी प्रतिसाद दिला नाही.
Share