रत्नागिरी‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’मधून सुमारे १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’मधून सुमारे १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’मधून सुमारे १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार;

महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षमतेवर उद्योगविश्वाचा विश्वास

मुंबईतील जिओ कन्वेक्शन सेंटर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये राज्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारे ८ लाख ५७ हजार ४५२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे ६७ सामंजस्य करार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या गुंतवणुकीतून २ लाख ९१ हजार १०९ रोजगारांच्या निर्मितीची अपेक्षा आहे.

या करारांमध्ये एरोस्पेस अँड डिफेन्स तसेच ऊर्जा आणि क्लीनटेक क्षेत्रातील प्रत्येकी १० करारांचा समावेश आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने डेटा सेंटर्स, माहिती-तंत्रज्ञान आणि सेमिकंडक्टर क्षेत्र आघाडीवर असून या क्षेत्रात ४ लाख १५ हजार ४९० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे.

ऊर्जा, क्लीनटेक, नवीकरणीय ऊर्जा, बॅटरी एनर्जी आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस क्षेत्रात १ लाख २ हजार ५१९ कोटी रुपयांचे करार झाले आहेत. अंतरिक्ष व संरक्षण क्षेत्रात २७ हजार ९३० कोटी रुपये, तर मेटल्स आणि मायनिंग क्षेत्रात ७५ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहेत.

याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात १२ हजार ६५१ कोटी रुपये, आरोग्य क्षेत्रात ६ हजार ५०० कोटी रुपये, पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स व बांधकाम साहित्य क्षेत्रात १८ हजार ७५१ कोटी रुपये, तसेच स्टील उत्पादन क्षेत्रात ७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत. केमिकल्स, शेती, सेवा आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC) क्षेत्रात ८ हजार ८०१ कोटी रुपये, तर अन्य विविध क्षेत्रांत १ लाख ८२ हजार ८१० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे.

महाराष्ट्राला देशातीलच नव्हे तर जगातील गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या उद्देशाने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हे व्यासपीठ कार्यरत राहणार असून, गुंतवणूकदारांच्या प्रत्येक गरजेची पूर्तता करण्यासाठी शासन एकसंघ पद्धतीने काम करेल. गुंतवणूकदाराने प्रकल्पाची निवड केल्यानंतर जमीन, वीज, पायाभूत सुविधा, परवानग्या आणि कुशल मनुष्यबळ या सर्व बाबींसाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून प्रकल्पाला गती देण्याची जबाबदारी शासनाची असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या नव्या लोगोमध्ये ‘इन्व्हेस्टमेंट’ आणि ‘महाराष्ट्र’ यांचा ‘I’ आणि ‘M’ यांच्या माध्यमातून संगम दाखविण्यात आला आहे. ‘मेड फॉर बिझनेस’ ही या उपक्रमाची ओळख असून, गुंतवणूकदार जेव्हा अधिकाऱ्यांशी संपर्क साधेल, निर्णयाची अपेक्षा करेल किंवा प्रकल्प सुरू करेल, तेव्हा शासनाला त्यांच्या वेळेचे महत्त्व समजले पाहिजे. समस्येची जबाबदारी स्वीकारून तिचे निराकरण करणे आणि उद्योगाच्या विस्तारापर्यंत शासनाने गुंतवणूकदारांसोबत राहणे, हा ‘मेड फॉर बिझनेस’चा खरा अर्थ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या शुभारंभासाठी ६७ प्रस्तावित सामंजस्य करारांचे पोर्टफोलिओ तयार करण्यात आले असून, त्यातून ८.५ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक आणि तीन लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या गुंतवणुकीत डेटा सेंटर, सेमीकंडक्टर, अक्षय ऊर्जा, प्रगत उत्पादन, एरोस्पेस, संरक्षण, आरोग्यसेवा आणि कृषीप्रक्रिया यांसारख्या भविष्यातील महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे.

प्रस्तावित गुंतवणुकीचा लाभ केवळ मोठ्या उद्योगांपुरता मर्यादित न राहता स्थानिक लघु व मध्यम उद्योग, पुरवठादार, युवक आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्योग क्षेत्राला केले. मोठ्या उद्योगांनी स्थानिक उद्योगांना आपल्या पुरवठा साखळीत संधी द्यावी, युवकांना आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी संस्थांसोबत काम करावे आणि स्थानिक उद्योगांच्या विस्ताराला हातभार लावावा, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई-३ आणि मुंबई-४ या शहरांच्या विकासासाठी एमएमआरडीएने सुमारे २१०० चौ.कि.मी. क्षेत्राचे एक्झिस्टिंग (लँड यूज) काम पूर्ण केले असून, ही प्रक्रिया भारतातील सर्वात जलद पूर्ण झालेली (ईएलयू) प्रक्रिया असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या कामामुळे दोन्ही शहरांच्या नियोजित विकासाचा पाया भक्कम होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या विकासाच्या दिशेने निर्माण झालेल्या नव्या संधींचा महाराष्ट्राला लाभ करून घेत २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाचा अर्थ अधिक उत्पादक उद्योग, नागरिकांचे वाढते उत्पन्न, सक्षम जिल्हे आणि महाराष्ट्रातच भविष्य घडविण्याचा युवकांचा आत्मविश्वास असा आहे. प्रत्येक गुंतवणुकीने या उद्दिष्टाला हातभार लावला पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ कार्यक्रमात आज गुंतवणुकीचे संकल्प करण्यात आले असून, त्यातून महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. राज्यातील उद्योगांना आवश्यक त्या सर्व सुविधा आणि सहकार्य देण्याची जबाबदारी उद्योग विभागाची असून, गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी विभागातील अधिकारी-कर्मचारी कटिबद्ध आहेत, अशी ग्वाही उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन यांच्यासह सनदी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील मान्यवर, गुंतवणूकदार, उद्योजक आणि राजनैतिक प्रतिनिधी उपस्थित होते.

Breaking News

नाईक प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल रत्नागिरीमध्ये दीनियात कार्यक्रम आणि सीरत-उन-नबी ﷺ चे आयोजन

नाईक प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल रत्नागिरीमध्ये दीनियात कार्यक्रम आणि...

जिल्ह्यात ‘रोजगार महाकुंभ’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्ह्यात ‘रोजगार महाकुंभ’ला उत्स्फूर्त प्रतिसाद: एकाच दिवशी १४ मेळावे,...