कडवईत भाजपला मोठे राजकीय बळ; व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र बोथरे यांचा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश
व्यापारी संघटना, सामाजिक क्षेत्र, युवक व महिलावर्गाचा भाजपला भक्कम पाठिंबा; प्रत्येक कार्यकर्त्याच्या अपेक्षांना न्याय देत सर्वांगीण विकासासाठी एकजुटीची भूमिका, संगमेश्वरच्या राजकीय समीकरणांना नवी दिशा
✒️ शाहिद अहमद तुळवे/कडवई
संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात कडवई व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रभाकर बोथरे यांनी भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. व्यापारी संघटना, सामाजिक क्षेत्र, युवक आणि महिलावर्गातील मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने कडवई परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून, या पक्षप्रवेशामुळे संगमेश्वर तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याला भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी उपस्थित राहून नवप्रवेशितांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले. यावेळी त्यांनी राजेंद्र प्रभाकर बोथरे यांच्यासह सर्व प्रवेशकर्त्यांना शुभेच्छा देत भारतीय जनता पक्षावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. हा विश्वास निश्चितच सार्थ ठरेल आणि आपल्या भागातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या अपेक्षांना न्याय दिला जाईल, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधताना प्रशांत यादव म्हणाले की, “भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपण विकास, राष्ट्रहित आणि जनसेवेचा मार्ग स्वीकारला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि ग्रामस्थांचा सन्मान, विश्वास आणि सहभाग जपणे ही आमची जबाबदारी आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी खांद्याला खांदा लावून काम करायचे आहे. पक्षात प्रवेश केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. विकासकामांना गती देत जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे.”
राजेंद्र प्रभाकर बोथरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भारतीय जनता पक्षाची विकासाभिमुख विचारसरणी, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिले जाणारे महत्त्व आणि जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांचे सक्षम नेतृत्व यावर विश्वास ठेवून आपण आणि आपल्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कडवई परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी, जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि संघटना अधिक बळकट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या पक्षप्रवेशामुळे व्यापारी वर्गाबरोबरच सामाजिक क्षेत्र, युवक आणि महिलावर्गाचा भारतीय जनता पक्षावरील वाढता विश्वास अधोरेखित झाला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात असून, यामुळे संगमेश्वर तालुक्यातील राजकीय वातावरणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कडवई परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद वाढण्याबरोबरच विकासाभिमुख राजकारणाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी भाजप ओबीसी मोर्चाचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष सहदेव बेटकर, पंचायत समिती सदस्य महेश उर्फ बावा जड्यार, संगमेश्वर उत्तर ग्रामीण मंडल अध्यक्ष विनोद म्हस्के, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत जाधव, संगमेश्वर उत्तर महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शितल दिंडे, गोरक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अविनाश गुरव, संगमेश्वर उत्तरचे सरचिटणीस प्रशांत रानडे, डॉ. अमित ताठरे, अन्वरभाई जबले, जितेंद्र वारोसे, गजानन ओकटे, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिस खान, सादिक खान, फिरदोस सय्यद, युवराज तुळसणकर, शरद सावरटकर, अनंत तुळसणकर, चंद्रकांत तुळसणकर, उमेश मांडवकर, दत्ताराम तुळसणकर, विठ्ठल पवार, निलेश तुळसणकर, सागर तुळसणकर, सोहम सावरटकर, अभिषेक मांडवकर, लक्ष्मण दंडगुले, योगिता तुळसणकर, शिल्पा सावरटकर, शुभांगी तुळसणकर, दिया सावरटकर, सुलभा मांडवकर, सुजाता तुळसणकर, विजय कुंभार, संतोष कुंभार, सचिन कुंभार, विद्या कुंभार, सोनाली कुंभार, सानिका कुंभार, रुपाली पवार, सुभाष कुंभार, विलास सुवरे, अजगर फणसोपकर, विनायक गुरव, महेंद्र कदम, तुषार कदम, विलास ओकटे, राजेश मांडवकर, विनोद मांडवकर, शुभम कुंभार, साहील पवार, प्रज्वल पवार, ज्ञानेश्वर पवार, हनुमंत दंडगुले यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
