🔶 रत्नागिरी कस्टम्स विभागाच्या पहिल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे दिमाखात आयोजन
👉रत्नागिरी कस्टम्स विभागातर्फे प्रथमच आयोजित कस्टम्स युनिटी कप 2025 या दोन दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पुणे कस्टम्सचे आयुक्त डी. अनिल यांच्या हस्ते संपन्न झाले. सहा प्रतिष्ठित संघ—कस्टम्स पुणे, जीएसटी पुणे, कलेक्टर ऑफिस रत्नागिरी, रत्नागिरी पोलीस, JSW जयगड पोर्ट आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड—. यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. विविध शासकीय विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष खेळाडू म्हणून मैदानात उतरल्यानं स्पर्धेला विशेष उत्साह आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली.
या उपक्रमाबाबत आयजी संजय दराडे यांनी उद्घाटनावेळीच विशेष प्रशंसा व्यक्त करत सांगितले की, “ही स्पर्धा म्हणजे खऱ्या अर्थाने एक ‘आइसब्रेकर’ ठरली. केंद्र आणि राज्य शासन विभागातील अधिकारी तसेच खाजगी क्षेत्रातील सहभागी यांना मुक्तपणे संवाद साधण्याची संधी मिळाली. परस्पर सुसंवाद व सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल.”
स्पर्धेतील सामने
23 नोव्हेंबर रोजी झालेल्या उत्कंठावर्धक अंतिम सामन्यात फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने रत्नागिरी पोलिसांचा 14 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले.
उपांत्य फेरी
पहिली उपांत्य फेरी: JSW जयगड पोर्टने केलेल्या 65/7 धावांच्या आव्हानाचा रत्नागिरी पोलिसांनी 6.4 षटकांत 66/4 असा दमदार पाठलाग केला.
दुसरी उपांत्य फेरी: फिनोलेक्सने 107/5 अशी भक्कम धावसंख्या उभारून कलेक्टर ऑफिस रत्नागिरीचा 42 धावांनी पराभव केला.
अंतिम सामना
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना फिनोलेक्सने 8 षटकांत 81/7 धावा केल्या. ओपनर प्रणय मुर्करचा 23 चेंडूंमध्ये 59 धावांचा तडाखेबाज खेळ हा सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला.
रत्नागिरी पोलिसांकडून आयजी संजय दराडे यांनी पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आणि एकूण दोन गडी बाद केले, तर कर्णधार देशमुख यांनी दोन धावांत दोन विकेट टिपत चमक दाखवली. मात्र रत्नागिरी पोलिसांचा डाव 67/5 वर थांबला.
व्यक्तिगत पुरस्कार
मॅन ऑफ द सीरिज : प्रणव मुर्कर
मॅन ऑफ द फायनल : प्रणय मुर्कर
सर्वोत्कृष्ट फलंदाज : प्रणय मुर्कर (फिनोलेक्स)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज : पंकज पाडेलकर
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक : अर्फान नाखवा
समारोप व गौरवोद्गार
समारोप सोहळ्यात आयजी संजय दराडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत म्हटले की, शासन विभागांमधील विश्वास, संवाद आणि समन्वय वाढविण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धा अत्यंत आवश्यक आहेत.
अतिरिक्त आयुक्त राहुल गवंडे यांनी सर्व सहभागी संघांचे, अधिकाऱ्यांचे आणि सहयोगींचे आभार मानले.
या वेळी सहाय्यक आयुक्त संदीप कृष्ण, उपसंचालक हर्ष जोशी, अधीक्षक अतुल गायकवाड आणि पोलिस निरीक्षक नितीन धरे हे व्यासपीठांवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे भविष्यात अशा आणखी संयुक्त क्रीडा उपक्रमांना चालना मिळेल आणि विविध यंत्रणांमध्ये सुसंवादाचा नवा अध्याय सुरू झाला, असे मत सर्वांनी व्यक्त केले.
