कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करा– आमदार प्रवीण दरेकर…

0
153

कोकण रेल्वे कार्पोरेशन हे भारतीय रेल्वेत कर्जासहित विलीनीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचे गटनेते आमदार. प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषद सभागृहात केली.

सध्या महाराष्ट्र विधिमंडळ सभागृहाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार. प्रवीण दरेकर यांनी कोकण रेल्वेच्या मुद्द्यावर विधान परिषदेमध्ये मत मांडले. कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांच्या दूरदर्शीपणामुळे कोकण रेल्वे साकारली आहे, ती भारतीय रेल्वे विलीनीकरण व्हावी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.

सन 1990 च्या दशकात ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’, या तत्त्वावर साकारली आहे. कोकण रेल्वे प्राधिकरण महामंडळाच्या माध्यमातून रेल्वेची बांधणी झाली. त्यानंतर दहा वर्षात भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावी असे ठरले असताना आज 25 वर्षे झाली तरी कोकण रेल्वे महामंडळ भारतीय रेल्वेत विलीनीकरण झालेले नाही. कोकण रेल्वे महामंडळ आर्थिक अडचणीत असल्यामुळे रेल्वे दुहेरीकरण, स्थानक बांधणे, पायाभूत सुविधा बाबतची कामे ठप्प आहेत. तसेच भारतीय रेल्वेकडून कोकण रेल्वेला अर्थसंकल्पात स्थान व निधी मिळत नाही. त्यामुळे कोकण रेल्वे महामंडळ कर्जासहित भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यात यावे आणि त्यासाठी मुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधावे, अशी मागणी आ. दरेकर यांनी केली आहे. याबाबत सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने आ. दरेकर यांना धन्यवाद दिले आहेत.

गेल्या दहा वर्षांपासून संसदेत होत आहे मागणी

कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये विलीन करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार आणि शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी संसदेत वारंवार केली आहे. तसा पत्रव्यवहार सुद्धा त्यांनी केला असून दहा वर्षे ते यासाठी आग्रही मागणी करत होते. भारतीय रेल्वेचे एकू ण नऊ विभाग आहे दहावा विभाग म्हणून कोकण रेल्वे विलीनीकरण करावे अशी मागणी होत असताना कोकण रेल्वे कार्पोरेशनला स्वंतत्र दर्जा द्यावा, कोकण रेल्वेचे कर्मचारी, अधिकारी यांनाही यात सहभागी करत त्यांना कोकण रेल्वे क्षेत्र बदलीसाठी पात्र ठेवावे, अशी मागणी कोकण रेल्वे कामगार संघटनांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here