रत्नागिरीगणेशोत्सवाच्या धामधुमीत चिपळूण पोलिसांनी शोधला हरवलेला मोबाईल

गणेशोत्सवाच्या धामधुमीत चिपळूण पोलिसांनी शोधला हरवलेला मोबाईल

गणेशोत्सवाच्या धामधुमीत चिपळूण पोलिसांनी शोधला हरवलेला मोबाईल
डीवायएसपी प्रकाश बेले यांच्या हस्ते रिक्षाचालकाला मोबाईल सुपूर्द; पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक*
चिपळूण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात वाढलेली गर्दी, वाहतूक कोंडी, गणेश विसर्जनाचा बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी चिपळूण पोलिसांवर असतानाही पोलिसांनी आपली कार्यक्षमता दाखवत हरवलेला मोबाईल अवघ्या काही दिवसांत शोधून काढला. शोधण्यात आलेला मोबाईल संबंधित रिक्षाचालकाच्या स्वाधीन करण्यात आला. पोलिसांच्या या तत्पर आणि कौतुकास्पद कामगिरीचे नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.

चिंचनाका येथील स्टेट बँक रिक्षा स्टँडवर रिक्षा व्यवसाय करणारे अविनाश आत्माराम कदम यांचा मोबाईल फोन दि. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास गहाळ झाला होता. मोबाईल हरवल्याचे लक्षात आल्यानंतर कदम यांनी तत्काळ चिपळूण पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली. गणेशोत्सवामुळे पोलिस यंत्रणा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्ताच्या कामात व्यस्त असतानाही या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आली.

पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक ओम आघाव, एएसआय अमोल यादव, हवालदार संतोष शिंदे, डी.बी.चे हवालदार वृषाला शेटकर, संदीप माणके, रोशन पवार तसेच महिला कॉन्स्टेबल रहाटे यांनी मोबाईलचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तांत्रिक बाबींचा वापर तसेच उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर पोलिसांना हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात यश आले.

मोबाईल सापडल्यानंतर मंगळवारी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले आणि पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या हस्ते तो अविनाश कदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने कदम यांनी चिपळूण पोलिसांचे मनापासून आभार मानले.

विशेष म्हणजे, चिपळूण पोलिसांनी गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत १३० पेक्षा अधिक हरवलेले मोबाईल शोधून संबंधित मालकांना परत केले आहेत. त्यामुळे मोबाईल हरवल्यानंतर नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

गणेशोत्सवासारख्या मोठ्या उत्सवाच्या काळात बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळतानाच नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन हरवलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी चिपळूण पोलिसांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. पोलिसांच्या या तत्परतेमुळे नागरिकांचा पोलिस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ होत आहे.

Breaking News

करंजा बंदराचा लवकरच विकास; १३६.७६ कोटींचा निधी मंजूर

करंजा बंदराचा लवकरच विकास; १३६.७६ कोटींचा निधी मंजूर--- मंत्री नितेश...