गणेशोत्सवानिमित्त 16 ठिकाणी वैद्यकीय पथकांची नियुक्ती; आतापर्यंत विविध आजारांच्या 435 रुग्णांची तपासणी-….
👉रत्नागिरी — गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकर मान्यांच्या माध्यमातून साथरोगांचा जिल्ह्यात फैलाव होऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य विभागामार्फत विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. दि. 10 सप्टेंबरपासून जिल्ह्यातील रेल्वे स्थानके, एस.टी. बस स्थानके तसेच विविध चेक पोस्टवर 16 वैद्यकीय पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत आतापर्यंत एकूण 435 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून या सर्व रुग्णांना आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने रोजगार व व्यवसायानिमित्त जिल्ह्याबाहेर वास्तव्यास असतात. गणेशोत्सवानिमित्त हे चाकरमानी मोठ्या संख्येने एस.टी. बस तसेच रेल्वेने जिल्ह्यात दाखल होत असतात. ते ज्या ठिकाणी वास्तव्यास असतात, त्या ठिकाणांहून विविध संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विशेष वैद्यकीय पथके नियुक्त केली आहेत.
जिल्ह्यातील 16 ठिकाणी वैद्यकीय पथके कार्यरत :
आरोग्य विभागामार्फत खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यांतील महत्त्वाच्या प्रवेशबिंदूंवर वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत.
खेड तालुका : भरणे नाका, दाभीळ फाटा व रेल्वे स्टेशन.
चिपळूण तालुका : पेढे-सवतसडा दर्शन, कळंबस्ते तिठा, बहादूरशेख नाका, रेल्वे स्टेशन, अलोरे घाटमाथा चेकपोस्ट व दहिवली फाटा.
संगमेश्वर तालुका : संगमेश्वर एस.टी. स्टँडजवळील पूलाखालील परिसर व देवरुख-मुर्शी चेकपोस्ट.
रत्नागिरी तालुका : हातखंबा तिठा व रेल्वे स्टेशन.
लांजा तालुका : वेरळ व कुवे गणपती मंदिरासमोरील परिसर.
राजापूर तालुका : राजापूर एस.टी. स्टँड.
या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार औषधोपचार, नमुना संकलन तसेच पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात येत आहे.
दि. 10 सप्टेंबरपासून करण्यात आलेल्या तपासणीमध्ये सर्दी-खोकला, विशेष ताप, कावीळ, अतिसार-हगवण तसेच इतर किरकोळ आजारांचे रुग्ण आढळून आले आहेत.
तपासणीदरम्यान आढळून आलेल्या रुग्णांकडून ते कोणत्या गावात जाणार आहेत आणि किती दिवस मुक्काम करणार आहेत, याची माहिती घेण्यात येत आहे. संबंधित रुग्णांच्या वास्तव्याच्या ठिकाणच्या आरोग्य संस्थांना आवश्यक खबरदारी घेण्याबाबत तसेच रुग्णांवर औषधोपचार करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांनी आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतःहून औषधोपचार न करता जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी. ताप, सर्दी-खोकला, अतिसार, उलट्या, कावीळ अथवा इतर आजारांची लक्षणे असल्यास तातडीने आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अस्मिता केंद्रे ,उपाध्यक्ष विलास चाळके ,मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
-(डॉ. अनिरुद्ध आठल्ये),
जिल्हा आरोग्य अधिकारी , रत्नागिरी
