३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान आठवड्यातून तीन दिवस धावणार गाडी
संगमेश्वर : दि. ४ ऑक्टोबर
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई-पुणे परिसरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवाळीत मोठ्या प्रमाणावर वाढते. या गर्दीचा ताण कमी करण्यासाठी चिपळूण–पनवेल आणि पनवेल–चिपळूण दरम्यान मेमू विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सेवा ३ ऑक्टोबर २०२५ ते २६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत उपलब्ध राहणार असून आठवड्यातून शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा तीन दिवसांसाठी ही गाडी चालेल.
नवीन वेळापत्रकानुसार, चिपळूणहून पनवेलकडे जाणारी गाडी क्रमांक ०११६० सकाळी ११.०५ वाजता सुटेल व संध्याकाळी ४.१० वाजता पनवेलला पोहोचेल. तर पनवेलहून चिपळूणकडे येणारी गाडी क्रमांक ०११५९ संध्याकाळी ४.४० वाजता सुटून रात्री ९.५५ वाजता चिपळूणला पोहोचेल.
या गाडीचा प्रवास मार्गातील अनेक ठिकाणी थांबणार आहे. गाडीचे थांबे पुढीलप्रमाणे आहेत.
आंजणी, खेड, कलंबणी बुद्रुक, दिवानखवती, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा आणि सोमाटणे.
ही गाडी पूर्णपणे अनारक्षित असल्यामुळे प्रवाशांना तिकीट स्थानकावरून किंवा यूटीएस मोबाइल ॲप द्वारे घ्यावे लागेल. तिकीट दर हे सामान्य मेल/एक्सप्रेस गाड्यांप्रमाणेच राहतील.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, गर्दीच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रवासाचे नियोजन वेळेत करावे आणि नव्या वेळापत्रकानुसार गाडी चालणार आहे ह्याची नोंद घ्यावी आणी आपला प्रवास सुनिश्चित करावा. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही विशेष सेवा सुरू केल्याने गावाकडे दिवाळी साजरी करण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
