निवळीमध्ये दहीहंडी उत्सवाचा जल्लोष; सात थरांवर दहीहंडी फोडत राजापुरातील जय हनुमान पथकाचा डंका–
प्रतिकात्मक दहीहंडीचे उद्घाटन आमदार किरण सामंत यांच्याकडून–
👉निवळी : निवळी येथे शनिवारी स्वराज प्रतिष्ठान शिवसेना आणि स्वराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय निवळकर यांच्या पुढाकारातून भव्य-दिव्य दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. संजय निवळकर यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमने विविध जबाबदाऱ्या नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडल्याने उत्सवाला आलेल्या नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या दहीहंडीत लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली होती. राजापुरातील जय हनुमान दिवटेवाडी पथकाने तब्बल सात थर रचत दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला.
या दहीहंडी उत्सवासाठी देवरुख, राजापूर, जयगड, खंडाळा, भोके, करबुडे आणि रावणंगवाडी येथून तब्बल २५ गोविंदा पथके सहभागी झाली होती. सर्वप्रथम प्रतिकात्मक दहीहंडीचे उद्घाटन भैय्याशेठ सामंत आणि गौरीताई निवळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
उत्सवात सहभागी झालेल्या प्रत्येक गोविंदा पथकाने पाच व सहा थरांची सलामी देत आपल्या कलेचे प्रदर्शन केले. सहभागी पथकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामध्ये जय भवानी पथक करबुडे-धनवडेवाडी यांनी सहा थरांची सलामी देत उपविजेतेपद पटकावले. तर जय हनुमान दिवटेवाडी, राजापूर या पथकाने तब्बल सात थर रचत दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला.
दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने लोकनृत्याचा आकर्षक अविष्कारही सादर करण्यात आला. पारंपरिक उत्साह, गोविंदा पथकांचा थरार आणि लोकनृत्यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमाला भैय्याशेठ सामंत, रवी नागरेकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांनी स्वराज प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक करत मंडळाला तसेच सहभागी सर्व गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. नियोजनबद्ध आयोजनामुळे निवळीतील दहीहंडी उत्सवाने उपस्थितांची मने जिंकली.
