परदेशातील नातेवाईकांसाठी घरचा फराळ पाठवणे झाले अधिक सोपे; टपाल विभागातर्फे विशेष सेवा व मोफत पिकअप सुविधा
रत्नागिरी, (जिमाका): दिवाळी सणाच्या निमित्ताने नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त परदेशात वास्तव्यास असलेल्या नातेवाईक व मित्रांना घरच्या फराळाची गोडी चाखता यावी, यासाठी टपाल विभागाने (Postal Department) परदेशात फराळाचे पार्सल पाठवण्याची विशेष सोय उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन या सेवेचा विस्तार करण्यात आला असून, जिल्ह्यातील नागरिकांनी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले आहे.
या उपक्रमामुळे परदेशात राहणाऱ्या मराठी बांधवांना चकली, लाडू, चिवडा, करंजी यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.
थेट घरातून मोफत पार्सल संकलन (Free Pick-up):
नागरिक आणि शहरातील मिठाई दुकानदारांची गैरसोय टाळण्यासाठी टपाल विभागाने यंदा थेट घरून किंवा दुकानातून पार्सल कलेक्ट (Pick-up) करण्याची विनामूल्य सुविधा दिली आहे. यासाठी इच्छुकांनी 8669919860 या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.
सुरक्षित पॅकिंग आणि नियमांचे पालन आवश्यक:
फराळ परदेशात पाठवताना टपाल विभागाच्या नियमांनुसार योग्य आणि सुरक्षित पॅकिंग करणे अनिवार्य आहे. पार्सलचा आकार, वजन आणि संबंधित देशानुसार पोस्टाचे दर लागू होतील. तसेच फराळ पाठवण्यापूर्वी संबंधित देशातील अन्न आयात नियमांची (Food Import Rules) पूर्वतपासणी करून घेण्याचे आवाहनही टपाल विभागातर्फे करण्यात आले आहे.
परदेशातील नातेवाईकांसाठी घरचा फराळ पाठवणे झाले अधिक सोपे; टपाल विभागातर्फे विशेष सेवा व मोफत पिकअप सुविधा
