पाकला धडा शिकवण्याची संधी असताना माघार का घेतली? शस्त्रसंधी वरून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचा मोदी सरकार वर हल्लाबोल—
‘ ऑपरेशन सिंदूर’नंतर बिथरलेला पाकिस्तान गेल्या चार ते पाच दिवसांपासून हिंदुस्थानवर ड्रोन आणि क्षेपणास्त्राने हल्ला करत सुटला आहे. हे हल्ले हिंदुस्थानने परतवून लावत पाकिस्तानवर प्रतिहल्ला केला. दोन्ही देशातील तणाव वाढत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आणि शनिवारी सायंकाळी शस्त्रसंधीही झाली. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी असताना शस्त्रसंधी का केली? असा खणखणीत सवाल माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे.
अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असे सांगण्यात येतंय हे चुकीचे आहे. आपण व्हाईट हाऊसचे निवेदन, ट्रम्प यांचे एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंट पहाल तर त्यांच्या सूचनेवरून हिंदुस्थानने युद्धबंदी स्वीकारलेली आहे. आमची माणसं मेली आहेत, आमच्या 26 महिलांचे कुंकू पुसले गेले. त्यामुळे ट्रम्प यांचा संबंध काय? ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्या शिवाय हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करताहेत? हिंदुस्थान हे सार्वभौम, स्वतंत्र राष्ट्र आहे. ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्धबंदी करतो. पण कोणत्या अटी-शर्तीवर? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
युक्रेन-रशिया युद्धावेळी भाजपने जाहीर केलेली की, पापा ने वॉर रुकवा दी. मग आता अमेरिकेच्या पापाने युद्ध थांबवले का? पुरा बदला लेंगे, पाकिस्तान के तुकडे करेंने अशी भाषा मोदींची होती. मग कुठे गेले ते तुकडे? जगात हिंदुस्थानची बेआब्रू झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात आम्ही युद्ध जिंकले. भक्त, अंधभक्त कुठे आहेत? कोणत्या अटी-शर्तींवरक युद्धबंदी केली यासाठी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत एक सर्वपक्षीय बैठक ताबडतोब व्हायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पळ काढता येणार नाही. पाकिस्तानला कायमस्वरुपी धडा शिकवण्याची संधी असताना युद्धबंदीची, माघार घ्यायची गरज काय? दरम्यान या विषयावरुन काँग्रेस सह सर्व विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी मोदी सरकार वर जोरदार टीका केली आहे