बंदर विभागात ‘एसीबी’चा मोठा धमाका; ६० हजारांची लाच घेताना वर्ग-१ अधिकाऱ्यासह खासगी फंटर जाळ्यात

0
2

बंदर विभागात ‘एसीबी’चा मोठा धमाका; ६० हजारांची लाच घेताना वर्ग-१ अधिकाऱ्यासह खासगी फंटर जाळ्यात–
रत्नागिरी,  (जिमाका): परदेशी जहाजाला ‘पोर्ट क्लिअरन्स सर्टिफिकेट’ आणि आवश्यक चाचण्यांची परवानगी देण्यासाठी तब्बल ८० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या (रत्नागिरी) प्रादेशिक बंदर अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ जाळ्यात पकडले. या कारवाईत लाचेचा पहिला हप्ता म्हणून ६० हजार रुपये स्वीकारणारा मिलिंद तुकाराम बनप हा खासगी इसम आणि मुख्य सूत्रधार प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप विलासराव भुजबळ वर्ग-१ या दोघांनाही एसीबीने ताब्यात घेतले असून, प्रशासकीय वर्तुळात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराची (वय ३७) रत्नागिरी येथे शिपिंग एजन्सी असून, त्यांच्यामार्फत परदेशी जहाजांना सेवा आणि दुरुस्तीची कामे पुरवली जातात. नुकतेच जयगड बंदरात (पोर्ट) आलेल्या एका नादुरुस्त परदेशी जहाजाची दुरुस्ती तक्रारदारांच्या एजन्सीने पूर्ण केली होती. या जहाजाची समुद्रात चाचणी (सी ट्रायल) घेण्याची परवानगी देण्यासाठी आणि जहाजाला ‘पोर्ट क्लिअरन्स सर्टिफिकेट’ मिळवून देण्यासाठी प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप विलासराव भुजबळ (वय ४७, वर्ग-१ अधिकारी) यांनी तडजोडीअंती ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने लाच देण्यास संमती दर्शवल्यानंतर भुजबळ यांनी समुद्र चाचणीऐवजी ‘फायर फायटिंग ट्रायल’ची परवानगी दिली. त्यानंतर १० नोव्हेंबर २०२६ रोजी पोर्ट क्लिअरन्स प्रमाणपत्रासाठी पुन्हा ८० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १३ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत लेखी तक्रार दाखल केली.
हॉटेलमध्ये सापळा आणि ‘त्या’ एका फोनने केला घात
एसीबी पथकाने १६ नोव्हेंबर रोजी तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, बंदर अधिकारी संदीप भुजबळ यांनी फोनवरून लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. एकूण ८० हजार रुपयांपैकी ६० हजार रुपयांचा पहिला हप्ता खासगी इसम मिलिंद तुकाराम बनप (वय ५३, रा. कोहिनूर क्रिस्टल, घाणेकर आळी, रत्नागिरी; मूळ रा. काळबादेवी) याच्याकडे सुपूर्द करण्यास भुजबळ यांनी सांगितले.
त्यानुसार १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मारुती मंदिर येथील ‘हॉटेल कार्निवल’च्या रेस्टॉरंट बारमध्ये सापळा रचण्यात आला. सायंकाळी ५ वाजून २१ मिनिटांनी मिलिंद बनप याने बंदर अधिकारी भुजबळ यांच्यावतीने तक्रारदाराकडून ६० हजार रुपयांची रोकड स्वीकारली. इतकेच नव्हे, तर पैसे मिळाल्याचे त्याने तत्काळ फोन करून भुजबळ यांना कळवले. याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने बनप याला रंगेहाथ झडप घालून ताब्यात घेतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.१५ वाजता मुख्य आरोपी प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ यालाही एसीबीने ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) चे कलम ७ आणि ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही धडाकेबाज कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या पर्यवेक्षणाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे, स.पो.फौ. उदय चांदणे, पोलीस हवालदार संजय वाघाटे, हेमंत पवार, आशिष बल्लाळ, श्रेया विचारे, राजेश गावकर आणि पोलीस कॉन्स्टेबल अजिंक्य पवार यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी फत्ते केली.
लाचखोरीविरोधात तक्रार करण्याचे आवाहन
कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी न घाबरता रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केले आहे.

  • टोल फ्री क्रमांक: १०६४
  • कार्यालयीन दूरध्वनी: ०२३५२-२२२८९३
  • व्हॉट्सॲप क्रमांक: ७०३८३९१०६४
  • पत्ता: पोलीस उपअधीक्षक कार्यालय, ला.प्र.वि., सावरकर नाट्यगृहाजवळ, मारुती मंदिर-नाचणे रोड, रत्नागिरी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here