मतदार यादीत नाव नोंदणीची पुन्हा संधी; ‘ASDD’ प्रवर्गातील मतदारांसाठी विशेष मोहीम

0
3

मतदार यादीत नाव नोंदणीची पुन्हा संधी; ‘ASDD’ प्रवर्गातील मतदारांसाठी विशेष मोहीम
१० डिसेंबरपर्यंत गणना प्रपत्रे सादर करण्याचे आवाहन; २२ डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार
रत्नागिरी,  (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) २०२६ अंतर्गत, प्रारुप मतदार यादीत नाव समाविष्ट न होऊ शकलेल्या ‘अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार’ (ASDD) प्रवर्गातील पात्र मतदारांना आपले नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी आयोगाने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. या प्रवर्गातील मतदारांनी येत्या १० डिसेंबर २०२६ पर्यंत आपली गणना प्रपत्रे (Enumeration Form) भरून द्यावीत, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले आहे.
या मोहिमेअंतर्गत दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, गणना प्रपत्र निर्गमित करूनही ज्या मतदारांची नावे अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार (ASDD) या प्रवर्गात समाविष्ट झाल्यामुळे प्रारुप यादीत येऊ शकली नव्हती, त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने दि. १७ नोव्हेंबर २०२६ च्या पत्रान्वये सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
सुधारित कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:

  • गणना प्रपत्रे तयार करणे व मुद्रित करणे: १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत
  • गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन: १८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत
  • गणना प्रपत्रे (EFs) निकाली काढणे: १० डिसेंबर २०२६ पर्यंत
  • नोटीस टप्पा / दावे व हरकतींचा निपटारा: ३१ ऑगस्ट ते १५ डिसेंबर २०२६
  • अंतिम मतदार यादी प्रकाशन: २२ डिसेंबर २०२६
    यादी कोठे पाहावी?
    ASDD प्रवर्गातील मतदारांची यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, रत्नागिरी यांच्या https://ratnagiri.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसीलदार कार्यालये, नगर परिषद, नगर पंचायत, पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये ही यादी पाहण्यासाठी उपलब्ध आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनाही ही यादी देण्यात आली आहे.
    तरी, प्रारुप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या या प्रवर्गातील पात्र मतदारांनी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे आपले गणना प्रपत्र भरून द्यावे आणि प्रशासनाच्या या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here