महाविद्यालयाचे विद्यापीठातील व मत्स्य शास्त्रातील योगदान आदर्शवत- कुलगुरू कर्नल कमांडंट डॉ. संजय भावे
प्रतिनिधी: “मत्स्य महाविद्यालय, शिरगांव, रत्नागिरी आपला ४५ वा स्थापना दिन साजरा करत असताना महाविद्यालयाचे विद्यापीठातील व मत्स्य शास्त्रातील योगदान आदर्शवत आहे. गेल्या ४४ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत महाविद्यालयाने शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण या तिन्ही आघाड्यांवर आपला ठसा उमटवला असून या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी जगभर आपल्या कामाने महाविद्यालयाचे तसेच विद्यापीठाचे नाव झळकवत आहेत याचा सार्थ अभिमान कुलगुरू या नात्याने मला आहे” असे प्रतिपादन डॉ. बा. सा. कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल कमांडंट डॉ. संजय भावे यांनी केले. मत्स्य महाविद्यालय शिरगांव रत्नागिरी च्या ४५ व्या स्थापना दिनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले महाविद्यालयाचे पाच माजी विद्यार्थी हे मत्स्य शास्त्राच्या विविध क्षेत्रात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात कार्यरत आहेत आणि हेच विद्यार्थी महाविद्यालयाचे खरे ‘सेलेब्रिटी’ आहेत असे गौरवोद्गार डॉ. भावे यांनी अध्यक्षीय भाषणात काढले. डॉ. बा. सा. कोकण कृषि विद्यापीठाचे सन्मा. कुलगुरू कर्नल कमांडंट डॉ. संजय भावे हे दूरदृष्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते.
उद्घाटनाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर डॉ. बा.सा. कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर मत्स्य महाविद्यालय, शिरगांव, रत्नागिरी चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी, मत्स्य जलशास्त्र व मत्स्य जीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. आसिफ पागारकर, मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान व मत्स्य विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. दबीर पठाण तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मत्स्य महाविद्यालयाचे पाच माजी विद्यार्थी उपस्थित होते. यात श्री. हर्षद कारुळकर, संचालक, इन डेप्थ मॅनेजमेंट इं. प्रा. लि.; श्री. विनय सावंत, सहाय्यक महाव्यवस्थापक, आयडीबीआय बँक, पुणे.; श्री. अभिषेक पवार, महाव्यवस्थापक, मे. जेकान्स मरीन एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड, गोवा.; श्री. नरेंद्र देशमुख, कार्यकारी अधिकारी, मा. मुख्यमंत्री कार्यालय, महाराष्ट्र.; श्री गजानन काटे, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, प्रादेशिक उपायुक्त कार्यालय, पुणे यांचा समावेश होता. याप्रसंगी नारळ संशोधन केंद्र, भाट्ये चे प्रभारी डॉ. किरण मालशे, कृषी संशोधन केंद्र, शिरगांवचे प्रमुख डॉ. सोनोने व मत्स्य महाविद्यालयाचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. मिलिंद सावंत आदी उपस्थित होते.
“मत्स्य महाविद्यालयातून गेल्या ४४ वर्षांमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विविध निर्यात कंपन्या, बँका, मत्स्य संवर्धन इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहेत आणि अनेक माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला आहे” असे कौतुकोद्गार कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांनी काढले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलनाने झाले.
आपल्या प्रस्ताविकात मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे यांनी मत्स्य महाविद्यालय रत्नागिरी हे संपूर्ण भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मत्स्य शास्त्रातील अभ्यासक्रम राबविणारे महाविद्यालय असून या महाविद्यालयाचे विद्यार्थी केंद्र सरकार, राज्य सरकार, खासगी क्षेत्र इ. ठिकाणी उच्च पदांवर कार्यरत असल्याचे आवर्जून सांगितले. भविष्यात मत्स्य महाविद्यालयाच्या प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी समन्वयाने आणि मेहनतीने एक संघ म्हणून काम केल्यास आपण देशातील मत्स्य शास्त्रात पदवी, पदव्युत्तर व पी.एचडी. अभ्यासक्रम शिकवणारे प्रथम क्रमांकाचे महाविद्यालय होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यासाठी सर्वांनी आपले भरीव योगदान द्यावे असे आवाहन केले.
उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर सद्या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या माजी विद्यार्थ्यांबरोबर “मत्स्य शास्त्रातील नोकरी, व्यवसाय व उद्योग संधी” याविषयावर ‘थेट संवाद’ साधून भविष्यातील संधी कोणत्या? आणि त्याची तयारी कशी करावी? याबाबत विस्तृत माहिती घेतली.
दुपारच्या सत्रात मत्स्य महाविद्यालयाचे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, इंग्लंड, जपान येथे शिक्षण, नोकरी निमित्त वास्तव्यास असलेल्या डॉ. श्रुतिका सावंत, डॉ. बानेश्वर सिंग, डॉ. रुचिरा सावंत, डॉ. अमित मोरे, श्री. अमोल भिंगार्डे, कु. सृष्टी सावंत, डॉ. दादासाहेब अकोलकर यांनी दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. ४५ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी डॉ. अनिरुद्ध अडसूळ यांचे मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यानंतर विविध स्पर्धांमध्ये व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुहास वासावे यांनी तर आभार डॉ. दबीर पठाण व डॉ. भावेश सावंत यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. रवींद्र पवार, डॉ. विजय मुळ्ये, डॉ. राजू तिबिले, श्री. मकरंद शारंगधर, डॉ. जयाप्पा कोळी, डॉ. राहुल सदावर्ते, डॉ. संतोष मेतर, श्रीमती स्नेहल गोळवणकर, डॉ. संदेश पाटील, श्री साई प्रसाद सावंत, श्री भालचंद्र नाईक, श्री वैभव येवले, डॉ. गजानन घोडे, डॉ. वर्षा भाटकर, श्रीमती मनीषा सावंत, डॉ. संगीता वासावे, श्रीमती मीनल काळे, डॉ. अजय देसाई, डॉ. विवेक निर्मळे, डॉ. मंगेश पाटील, श्री विनायक विश्वासराव, श्रीमती प्रज्वला बागुल, श्री. अण्णासाहेब कारखेले, श्री. प्रमोद खरमाटे, श्री. रमेश तळेकर, श्री. डार्विन भालाधरे, श्री. प्रतिक यादव, कु. मृणाल नासरे, कु. प्रतिक्षा निंबार्ते आदींनी विशेष मेहनत घेतली.