रत्नागिरीमहाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रत्नागिरी येथे १२ फेब्रुवारी पासून--

महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रत्नागिरी येथे १२ फेब्रुवारी पासून–


महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित २१ वी महाराष्ट्र राज्य बाल नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ पासून १८ फेब्रुवारी२०२५ पर्यंत रंगणार आहे.
प्राथमिक फेरीतून पात्र झालेले महाराष्ट्र भरातील एकूण ३२ संघ या अंतिम फेरीमध्ये आपले बालनाट्य सादर करणार आहेत.

रत्नागिरी मध्ये आत्तापर्यंत गद्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी आणि संगीत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी झालेली आहे.

बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पहिल्यांदाच रत्नागिरीमध्ये होत आहे.

या बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये सुमारे ५०० पेक्षाहून अधिक बालकलाकार आपली कला सादर करणार आहेत.

महाराष्ट्र मधून येणाऱ्या संघांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, संभाजीनगर, अहिल्यानगर, जळगाव, परभणी, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, कल्याण, यवतमाळ, अकोला, नंदुरबार, भुसावळ, नाशिक, सांगली, नांदेड, अमरावती तसेच इंदौर येथून संघ सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे होणार आहे.

दिनांक १२, १३, १४, १६, १७, १८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत ही स्पर्धा पार पडणार आहे.

मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य श्री. आशिष शेलार आणि मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत आहे.

या बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीमधील स्पर्धक संघाचे मनोधैर्य वाढवण्याकरीता, त्यांना शुभेच्छा देण्याकरता आणि विविध विषयांवरची विविध अंगी बालनाट्य पाहण्याकरिता रत्नागिरी मधील सर्व शाळांनी आपापल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही स्पर्धा पाहण्याकरता नाट्यगृहावर घेऊन यावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी केले आहे.
या स्पर्धेचे समन्वयक म्हणून श्री. नंदू जुवेकर काम पाहत आहेत.

Breaking News