रत्नागिरीमहाराष्ट्र राज्याचा 67 वा स्‍थापना दिन ; पालकमंत्र्यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्‍थापना दिन ; पालकमंत्र्यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्‍थापना दिन ; पालकमंत्र्यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना
महाराष्ट्र राज्याला, राज्याच्या परंपरेला आणि संस्कृतीला साजेसा विकास रत्नागिरीमध्ये
-पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी, दि. 1 (जिमाका) : विमानतळ उड्डाणासाठी तयार आहे. रेल्वे स्टेशन देखील नव्याने कात टाकतयं. प्रशासनाची इमारत देखील 100 कोटी रुपये खर्च करुन पुर्णत्वास येत आहे. नगरपालिकेचे इमारत देखील पूर्ण झालेली आहे. जिल्हा परिषदेची इमारत देखील पूर्ण झालेली आहे. 169 कोटी रुपयांमधून पोलीस इमारतीचे बांधकाम सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्र देखील येत्या 2 ते 3 महिन्यात लोकार्पण करणार आहोत. आरेवारे किनाऱ्याजवळील वन खात्याच्या जमिनीवर 5 कोटी रुपयांचे इको ट्युरिझम डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास जाईल. महाराष्ट्र राज्याला, महाराष्ट्र राज्याच्या परंपरेला आणि संस्कृतीला साजेसा असा विकास या रत्नागिरीमध्ये करतोय. या विकासाला जिल्ह्यातील जनतेने साथ द्यावी, अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ. उदय सामंत
यांनी आज व्यक्त केली.
👉महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त येथील पोलीस परेड ग्राऊंडवर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ. सामंत यांनी राष्ट्रध्वज फडकावून त्याला मानवंदना दिली. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक बी.बी. महामुनी मंचावर उपस्थित होते. या सोहळ्यास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता केंद्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह लोकप्रतिनिधी, इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी परेड निरीक्षण केले. तसेच परेड संचालनाकडून मानवंदना स्वीकारली.
शुभेच्छा संदेश देताना पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम नागरिक बंधू भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो. आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्यादेखील मन:पूर्वक शुभेच्छा देतो. आजच्या दिवशी 1960 सालामध्ये मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. अनेक स्वातंत्र्य सेनानी असतील, समाजसेवक असतील त्यांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र निर्माण झाला आहे. ही भूमी छत्रपती शिवरायांची आहे. ही भूमी छत्रपती संभाजी महाराजांची आहे. शाहू, फुले, आंबेडकरांची आहे. म्हणूनच अभिमानाने जय महाराष्ट्र कायमस्वरुपी संबोधत असतो. त्याच महाराष्ट्राला वंदन करण्याचा आज दिवस आहे.
रत्नागिरी जिल्ह्याच्या बाबत नाविन्यपूर्ण उपक्रम सांगायचे झाले तर आपल्या उपक्रमांची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांसाठी नासा आणि इस्त्रो येथील अभ्यास दौरा ही योजना आपण 4 वर्षापासून रत्नागिरीत सुरु केली. आज ती योजना अख्या महाराष्ट्रात राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. याचा अर्थ रत्नागिरीचे जिल्हा प्रशासन नाविन्यपूर्ण योजना राबवितो. हे महाराष्ट्राच्या पातळीवर सिध्द झाले आहे. रत्नागिरीचे पोलीस दल हे सक्षम असावे, यासाठी नियोजन मंडळातून मागच्याच 15 दिवसांपूर्वी नवीन 25 गाड्यांचा लोकार्पण सोहळा झाला आहे. आज देखील काही नवीन गाड्यांचा लोकार्पण होत आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस दल हे सक्षम असावं, हा त्यामागचा भाव आणि त्यामागची भावना आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचा आराखडा 29 कोटींनी वाढवून दिला आहे. यामधून कृषी, मत्स्य, शिक्षण, पर्यटन अशा सगळ्याच बाबींवर आपण खर्च करत आहोत. गेल्या अर्थिक वर्षात नियोजन समितीच्या माध्यमातून 406 कोटींचा निधी खर्च झाला आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून रत्नागिरी केंद्रीय विद्यालय मंजूर झाले आहे. त्याला 1 रुपये नाममात्र दराने नाचणे मधील अडीच हेक्टर जागा देण्याचा निर्णय कालच महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या शैक्षणिक वैभवामध्ये फार मोठी भर पडणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 100 टक्के पूर्ण केली. पीएम किसान योजनेच्या 22 हप्त्यांचे वितरण झाले आहे. नमो किसान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 59 हजार 589 शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. फळपीक विम्यामधून देखील 107 कोटी रुपयांचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर, मंडणगड, रत्नागिरी, राजापूर या पाच मतदार संघामध्ये प्रत्येकी 3 कोटी रुपयांचे संविधान भवन उभारण्यात येत आहेत. हा महाराष्ट्रातील पहिला उपक्रम आहे. या संविधान भवनमध्ये युपीएससी, एमपीएससी याचे प्रशिक्षण आपण सुरु करणार आहोत. बार्टीचे कार्यालय तालुका ठिकाणी असावे, हा प्रयत्न देखील संविधान भवनच्या माध्यमातून करणार आहोत. रत्नागिरी जिल्हा आणि जिल्ह्याचे प्रशासन महाराष्ट्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे पहिले प्रशासन आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून 31 रुग्णांलयाची नोंद झाली आहे. यामधून शेकडो रुग्णांना फायदा दिलेला आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातून देखील 4 कोटी 78 रुपयांचे अनुदाने लाभार्थ्यांना दिले आहे. आरेवारे किनारा येथील वन खात्याच्या जमिनीवर 5 कोटी रुपये खर्च करुन इको ट्युरिझम उभारण्याचा निर्णय जिल्हा नियोजन मंडळाने घेतला आहे. हे काम डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास जाईल. रत्नागिरी विमानतळ देखील उड्डाणासाठी तयार झालेले आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनदेखील नव्याने कात टाकतयं. रत्नागिरी प्रशासनाची इमारत देखील 100 कोटी रुपये खर्च करुन पूर्णत्वास येत आहे. नगरपालिकेचे इमारत देखील पूर्ण झालेली आहे. जिल्हा परिषदेची इमारत देखील पूर्ण झालेली आहे. पोलीसांसाठी दिलेल्या 169 कोटी रुपयांमधून इमारतीचे बांधकाम सुरु आहे. महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा हा प्रशासकीय इमारती परिपूर्ण असलेला आणि नवा असलेला हा पहिला जिल्हा आहे, याचा मला अभिमान आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.
रत्नागिरीमध्ये उभारलेल्या शिवसृष्टीला लाखो पर्यटकांनी आजपर्यंत भेट दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्र देखील येत्या 2 ते 3 महिन्यात लोकार्पण करणार आहोत. महाराष्ट्र राज्याला, महाराष्ट्र राज्याच्या परंपरेला आणि संस्कृतीला साजेसा असा विकास या रत्नागिरीमध्ये करतोय आणि या विकासाला रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने साथ द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली.
पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध सन्मान
सागर कवच अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक बी.बी. महामुनी यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक विवेक पाटील, अंमलदार सचिन घाग, मारुती हलगी, अशोक राठोड, संदेश चव्हाण, मोरेश्वर मयेकर, दिपक गोठणकर, लक्ष्मण कोकरे, पोपट गव्हाणे, शीतल पिंजरे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्ररशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
स्टुडन्ट पोलीस कॅडेट कार्यक्रमांतर्गत जवाहर नवोदय विद्यालय राजापूर यांचा द्वितीय क्रमांक आल्याबद्दल मुख्याध्यापक एस.बसवराज, वैष्णवी पाटोळे, देवयानी महात्मे, प्रशब्ध कांबळे, दुर्वा शिंदे, दिपाल भंडारी, मंजिरी तांबे, गंधार संसारे, सार्थक दुर्गावळे, आर्यन मेन, कार्तिक हदमबर यांचा सन्मान करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्याबाई पुरस्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते अश्विनी मोरे, निकिता जाधव, साक्षी गावणांग, धनश्री मोरे यांना वितरीत करण्यात आला.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलास देण्यात येणाऱ्या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

Breaking News

मुंबई-गोवा महामार्गावर खेड भरणे येथे उभ्या ट्रकला वॅगनार कारची धडक; सहा जण जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर खेड भरणे येथे उभ्या ट्रकला वॅगनार कारची...

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन--रत्नागिरी, दि. 1 (जिमाका)...