चिपळूणमांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात 'राष्ट्रीय युवक सप्ताह' उत्साहात साजरा

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात ‘राष्ट्रीय युवक सप्ताह’ उत्साहात साजरा

चिपळूण, मांडकी-पालवण, १४ जानेवारी २०२६:
कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने १४ जानेवारी २०२६ रोजी ‘राष्ट्रीय युवक सप्ताह’ साजरा करण्यात आला. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १२ ते १९ जानेवारी दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या या सप्ताहाचे औचित्य साधून महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वृषाली गोफणे हिने केले, तर प्राध्यापक बोकडे यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व व कौशल्य विकासाचे महत्त्व पटवून दिले.
याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांच्या जीवनशैलीवर आधारित प्रेरणादायी व्याख्याने दिली. यामध्ये चतुर्थ वर्ष विद्यार्थी मयुरी ढेकळे, सावित्री गुब्याड, अथर्व बर्गे, वैभव पवळ आणि प्रथम वर्ष विद्यार्थी कृषीराज मोरे व तुषार कांबळे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्वामीजींच्या जीवनातील विविध प्रसंग सांगतानाच, तरुणांनी त्यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम होते, त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून युवक शक्तीचे महत्त्व विषद केले. या कार्यक्रमास जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या बौद्धिक सत्राचा लाभ घेतला व हा सप्ताह उत्साहात पार पडला.

Breaking News