संगमेश्वर /एजाज पटेल
आपल्या दैनंदिन कामासाठी संजय वाडकर हे वाहनाने रस्त्यावरून चालले होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला निपचित पडलेला बैल त्यांना दिसला. तो मृत असावा असा अंदाज बांधून दफन करण्यासाठी जे.सी.बी. बोलावला. काही वेळाने बैलाने हालचाल केली.
जवळ जाऊन पाहिले तर गंभीर स्वरूपाची दुखापत त्या मुक्या जनावराला झाली होती.
तत्काळ विरेंद्र सुतार, हॉटेल मैत्री पार्क चे मालक जितेंद्र सुतार,तेजस जाधव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पशू वैद्यकीय अधिकारी यांना घटनास्थळी बोलावून घेतले. ताबडतोब डॉ. मनोहर ढाकणे, सा. पशुधन विकास अधिकारी संगमेश्वर, डॉ. सुरज जगताप, डॉ. संतोष बेंगलवाड हे उपस्थित झाले.
शर्थीचे प्रयत्न करून त्या दुखापत ग्रस्त बैलावर उपचार सुरू झाले. रस्त्याच्या कडेला मृत्यूची प्रतिक्षा करणाऱ्या या मुक्या जनावरासाठी हे मदतकर्ते
देवदूत ठरले. संगमेश्वर परिसरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त व्हावा यासाठी प्रसारमाध्यमांनी आवाज उठवला पण कोणत्याही संघटनेने, अथवा जनावरांच्या मालकांनी तसदी घेतली नाही.
उन पावसात मिळेल त्या आडोशाला हि जनावरे उभी असतात. महामार्गावर बिनधास्त फिरतात. अशाप्रकारे एखाद्या भरधाव वाहनाची धडक लागून मृत्यूमुखी पडतात. चुक कोणाची? हा प्रश्न नेहमीप्रमाणे धूळ खात पडतो.
या घटनेत एक गोष्ट ध्यानात आली. मुक्या जनावरांना जीव लावणारे काही बांधव आहेत. कुरधुंडा येथील रिक्षा व्यावसायिक तेजस जाधव हे उपचारा दरम्यान घटनास्थळी हजर होते. त्यानंतर त्या बैलाला चारा पाणी देण्याची व्यवस्था स्वतः तेजस जाधव करत आहेत.
असे अपघात घडत राहतात, पण वेग नियंत्रणात असेल तर अपघात टाळता येऊ शकतात.
प्रशासकीय यंत्रणेला जेव्हा येईल तेव्हा जाग येवो, पण तोपर्यंत
आपण आपली जबाबदारी ओळखून वागायला हवे!
*मुंबई गोवा महामार्गावर निढळेवाडी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बैलाला जबर दुखापत. पशुवैद्यकीय अधिकारी आणि प्राणी मित्र घेत आहेत काळजी!
