रत्नागिरीमोठेपणी हॉकी खेळामध्ये करिअर करण्याचे स्वप्न राहिले अधुरे; देवरूखच्या मृण्मयी कुलकर्णीचा १४...

मोठेपणी हॉकी खेळामध्ये करिअर करण्याचे स्वप्न राहिले अधुरे; देवरूखच्या मृण्मयी कुलकर्णीचा १४ व्या वर्षी दुर्धर आजाराने मृत्यू

मोठेपणी हॉकी खेळामध्ये करिअर करण्याचे स्वप्न राहिले अधुरे; देवरूखच्या मृण्मयी कुलकर्णीचा १४ व्या वर्षी दुर्धर आजाराने मृत्यू

👉देवरूख- मराठी शाळेत शिकत असतानाच हाँकी खेळाची आवड निर्माण झाली. मोठेपणी या खेळात करिअर करून नावलौकिक मिळवायचे असे स्वप्न उराशी बाळगलेल्या संगमेश्वर तालुक्यातील देवरूख बागवाडी येथील मृण्मयी योगेश कुलकर्णी या विद्यार्थीनीचे हे स्वप्न अधुरेच राहिले आहे. गेली दोन वर्ष दुर्धर अशा आजाराशी मृण्मयी झुंज देत होती. अखेर गुरूवारी मृण्मयीची ही झुंज अपयशी ठरवली. दुर्धर आजाराचा सामना करत असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिच्या अकाली मृत्यूने देवरूख शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

देवरूख शहरातील बागवाडी येथील पौराहीतिक योगेश कुलकर्णी यांची मृण्मयी ही सुकन्या. मृण्मयी ही लहानपणापासूनच अत्यंत हुशार व शालेय सर्व स्तरावर सहभागी होणारी अशी शाळकरी मुलगी. देवरूख शाळा क्र. ३ या शाळेत शिकत असताना मृण्मयीने हॉकी या खेळात सहभाग घेतला. अत्यंत मनापासून या खेळाचा ती सराव करत असे. तालुका, जिल्हा स्पर्धांमध्ये देखील तिने सहभाग घेतला होता. नंतर सातवी इयत्तामध्ये न्यू इंग्लिश स्कूल, देवरूख या प्रशाळेत ती दाखल झाली. शालेय जीवनात ती चित्रकला, नृत्य, खो – खो अशा स्पर्धांमध्ये सदैव सहभागी होऊन यश देखील मिळवत असे. मृण्मयी तितकीच अभ्यासातही हुशार होती.

मृण्मयीचे बाबा योगेश हे आपला मुलगा यशला पौराहित्यातील रुद्र शिकवत असताना ते ऐकून मृण्मयीने रुद्र मुखदगत केला होता. मृण्मयी अत्यंत सुस्वाभावी होती. ती लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांशीच खेळीमेळीने वावरत असे. यामुळे मृण्मयीने सगळ्यांनाच लहान वयात आपलेसे केले होते. परिसरातील सर्वच कार्यक्रमांमध्ये मृण्मयी सहभागी होत असे. तिच्यातील कला गुण बहरत असतानाच ईश्वराला हे मान्य नव्हते. मे २०२४ या वर्षामध्ये तिची तब्येत काहीशी बिघडली. पोट दुखणे व पचनाचा त्रास अशा तिच्या आजाराला सुरुवात झाली. वैद्यकीय सर्व तपासण्या करत असतानाच तिच्या मेंदूला गाठ असल्याचे निष्पन्न झाले.

ही गाठ काढण्याबाबतची शस्त्रक्रिया अत्यंत अवघड व किचकट होती. असे असतानाही मृण्मयीने डॉक्टरांना धारिष्ट दाखवत शस्त्रक्रिया करा मला बरे करा अशी हाक दिली. डेरवण येथील वालावलकर रुग्णालयातील डॉक्टरांच्या समूहाने देखील मृण्मयीच्या या भावनेला साथ देत अवघड अशी तब्बल १२ तासांची शस्त्रक्रिया यशस्वी केली. कमी वयात झालेल्या या शस्त्रक्रियेला सामोरे जात लवकर बरी होणारी रुग्ण म्हणून मृण्मयीकडे पाहिले जात होते. याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यातून अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या डॉक्टरांवर अभिनंदनचा वर्षाव देखील होत होता. या शस्त्रक्रिया प्रसंगी देवरुख परिसरातील नागरिक व मृण्मयीच्या नातेवाईकांनी पुढाकार घेत आर्थिक मदत केली होती. ही मदत व नागरिकांचे आशीर्वाद यामुळे या शस्त्रक्रियेनंतर काही महिन्यातच मृण्मयी पूर्वीसारखी बरी झाली.

शाळेत देखील जाऊ लागली, अभ्यासात मग्न होऊ लागली हे देखील कुठेतरी नियतीला मान्य झाले नाही. अन वर्षभरातच पाठदुखी व खांदादुखी असे दुखणे सुरू झाले. या काळात मृण्मयीने आठवीची परीक्षा देखील यशस्वी केली. मृण्मयीच्या सुरु झालेल्या आजाराबाबत वैद्यकीय तपासण्या, पूर्वीचे परत उपचार याला सामोरे जावे लागले. मेंदूच्या गाठीतील काही जंतू मृण्मयीच्या मणक्यांमध्ये उतरल्याचे निष्पन्न झाले. हे जंतू कर्करोगाचे असल्याचे स्पष्ट झाले. यानुसार केमो, रेडिएशन अशा उपचार पद्धतीला मृण्मयी सामोरे जाऊ लागली. एकच ध्यास मला बरे व्हायचे आहे. यासाठी डॉक्टर जी उपचार पद्धती सांगतील त्याला मृण्मयी सकारात्मक प्रतिसाद देत होती.

असे असताना गेली दोन महिन्यांपासून तिचा हा आजार बळावत चालला. यातच तिची प्रकृती खालावत जात होती. दुर्दम्य अशा या आजाराला ती सतत झुंज देत होती. डॉक्टरही तिच्या या प्रतिसादाला सॅल्यूट करत होते. दोन वर्षांच्या आजारामध्ये सुमारे एक वर्ष ती रुग्णालयातच उपचार घेत होती. या उपचाराप्रसंगी तिचे आई- वडील, काका- काकू, भाऊ व चुलत बहिणी रुग्णालयामध्ये मृण्मयीला बळ देण्याचे काम करत होते. गुरुवारी रात्री मृण्मयीची ही झुंज अखेर नियती पुढे हरली, मृण्मयीने या जगाचा निरोप घेतला. वयाच्या चौदाव्या वर्षी मृण्मयी हे जग सोडून गेली. हे वृत्त देवरुखमध्ये कळताच सर्वांचेच डोळे पाणावले. तिच्या शाळेत देखील तिला श्रद्धांजली वाहण्यात आली. मोठी स्वप्ने मृण्मयीने बाळगली होती. ती पूर्ण करण्याचा तिच्यामध्ये आत्मविश्वास देखील होता. मात्र नियतीच्या मनामध्ये वेगळेच होते. मृण्मयीच्या अचानक जाण्याने देवरुखवासिय हळहळले आहेत. मृण्मयीच्या पश्चात आई-वडील, भाऊ, काका- काकू व दोन बहिणी असा परिवार आहे.

Breaking News