रत्नागिरी कोल्हापूर या दोन महत्त्वाच्या केंद्रांना आता भुयारी महामार्गाने जोडले जाणार आहे— पालकमंत्री उदय सामंत यांच्या भेटी दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली घोषणा–
👉रत्नागिरी-कोल्हापूर मार्गाचे आंबा घाटातून सिंगल लाईन मार्गाचे काम झाले आहे. त्यामुळे आता भुयारी मार्गाने आंबा घाट कोल्हापूरला जोडण्यात येईल. परिणामी कोल्हापूर आणि रत्नागिरी दरम्यानचा प्रवास कोणत्याही अडथळ्या विना अत्यंत वेगवान होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना नागपूर येथे त्यांच्या निवासस्थानी शनिवारी ही अत्यंत महत्त्वाची माहिती दिली.
हा नवीन मार्ग थेट आंबा घाटातून जाईल. महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे जोडणारा हा भव्य प्रकल्प पथदर्शी ठरणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी केंद्रीय मंत्री गडकरी यांची नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली आणि कोकणातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान मुंबई ते गोवा महामार्गावरील प्रलंबित कामांचीही सखोल चर्चा करण्यात आली. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील टोल कमी करण्यासाठी कशी पावले उचलता येतील, यावर लवकरच वरिष्ठ अधिकारी गटाची बैठक घेण्यात येणार आहे.
तसेच, रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी ते जयगड रस्ता, जयगड ते गुहागर रस्ता, आणि चिपळूण ते सातारा रस्ता बांधणी यावर लवकरच रेखांकने (डिझाईन्स) मागवली जाणार आहेत. हे नवीन रस्ते भविष्यात या भागातील विकासाला मोठी चालना देतील यात शंका नाही. यासोबतच लांजा, राजापूर, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, खेड, दापोली आणि मंडणगड या मतदारसंघांतील विविध विकासात्मक कामांना भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विशेष मागणीही सामंत यांनी यावेळी नितीन गडकरी यांच्याकडे केली.
